भाजपा आमदार नरेंद्र मेहतांसह पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 10:31 PM2019-09-21T22:31:15+5:302019-09-21T22:31:40+5:30
कनकिया भागातील नाविकास क्षेत्र, सीआरझेड, भरतीची उच्चतम रेषा, कांदळवन ने बाधित असलेल्या जागेत पर्यावरणाचा रहास करुन बेकायदेशीर भराव केला गेला.
ठाणे - मीरारोडच्या कनकिया भागातील वादग्रस्त ७११ क्लब तथा तारांकित हॉटेल प्रकरणी अखेर भाजपा आमदार नरेंद्र मेहतांसह पालिका आयुक्त व सर्व संबंधित अधिकारायां विरोधात मीरारोड पोलीसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्या नंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतला.
कनकिया भागातील नाविकास क्षेत्र, सीआरझेड, भरतीची उच्चतम रेषा, कांदळवन ने बाधित असलेल्या जागेत पर्यावरणाचा रहास करुन बेकायदेशीर भराव केला गेला. कांदळवनाचा राहास केल्या प्रकरणी शासनानेच तब्बल चार गुन्हे दाखल केले. तर पालिकेने देखील एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला होता.
तरी देखील महापालिकेने सदर ठिकाणी विकास नियंत्रण नियमावली सह दाखल गुन्हे, सीआरझेड, उच्चतम भरती रेषा आदी दुर्लक्षित करुन २०१५ साली पहिली बांधकाम परवानगी दिली. बेसमेंट, तळ अधिक १ मजला अशी जिमाखाना वापरा साठी दिलेली बांधकाम परवानगी २०१७ मध्ये जिमखाना व क्लब हाऊस करीता सुधारीत करुन दिली. तर २०१८ मध्ये क्लब हाऊस व तारांकित हॉटेल करीता अधिकचे १ चटईक्षेत्र वापरुन बेसमेंट, तळ अधिक चार मजले अशी देण्यात आली.
विकास नियंत्रण नियमावलीत नाविकास क्षेत्रात जिमखाना साठी परवानगी देय असली तरी क्लब व हॉटेलसाठी मात्र वापर परवानगी नसताना दिली गेली. सदर ठिकाणी कोणताही राज्य व राष्ट्रीय महामार्ग नसताना देखील शासनाच्या २०१५ मधील अधिसुचनेचा महामार्गा लगतचा हवाला देऊन १ चटईक्षेत्र मंजुर करुन घेतले. नगरविकासचे प्रधान सचीव नितीन करीर यांच्या कडे चटईक्षेत्र मंजुरीसाठी झालेल्या बैठकीवेळी स्वत: आ. मेहता देखील हजर होते.
त्या नंतर आणखी एक चटईक्षेत्र मिळावे म्हणुन महासभेत सदर क्लब सह परिसरातील अन्य सर्वे क्रमांकच्या जागा रहिवास क्षेत्र करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपाने केला. त्यावर अजुन शासनाची मंजुरी झालेली नाही. महत्वाचे म्हणजे ३० मीटर रस्त्या लगत पासुनची ३० मीटर पर्यंतच्या जागेत रहिवास वापर केला जात असल्याचा आधार घेत प्रत्यक्ष बांधकाम मात्र सुमारे २५ मीटरच्या अंतरा नंतर पुढे सुरु होत आहे. बेसमेंट मध्ये चक्क बार, पब, पत्त्त्यांचा क्लब आदी वापर सुरु करण्यात आला आहे.
सदर क्लबची जागा मुळ जमीन मालकां कडुन अधिकारपत्र धारक या नात्याने आ. मेहतांनीच त्यांच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल्स प्रा.लि. ला अभिहस्तांतरण केली. सदर कंपनीचे मुळ संस्थापक - संचालक मेहताच असुन ते व त्यांच्या पत्नी भागधारक आहेत. महत्वाचे म्हणजे २०१६ साली संचालक, नगररचना यांनी सदर बांधकामा साठी वाढिव १ चटईक्षेत्राचा प्रस्ताव शासनाने फेटाळुन लावल्याचे अन्य एक संदर्भ देताना स्पष्ट केले होते.
इतकेच नाही तर ३० मीटर रस्त्या लगत ३० मीटर पर्यंत रहिवास वापर करता येत असला तरी तेथे केवळ तळ अधिक एक मजलीच इमारत बांधकाम करता येईल. त्या ठिकाणी आर - २ झोन प्रमाणे चटईक्षेत्र वा ९.७५ मी. पेक्षा जास्त उंचीची इमारत बांधता येणार नाही असे स्पष्ट केले होते. तरी देखील सदर बाब वाढिव चटईक्षेत्र मंजुर करताना दुर्लक्षित करण्यात आली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारींची महापालिका व पोलीसांनी दखल घेतली नव्हती. आ. मेहतांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन स्वत:च्या फायदद्यासाठी प्रशासनाशी संगनमत करुन नियमबाह्य परवानग्या मिळवुन क्लब - हॉटेलचे बांधकाम केल्याने विविध कायदे - नियमां खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
त्या मुळे उच्च न्यायालयात याचीका दाखल केली असता न्यायालयाने तक्रारदाराच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते. त्या अनुषंगाने आज शनिवारी आ. मेहतांसह पालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर क्लब सुरवाती पासुनच पर्यावरणाचा राहास केल्या प्रकरणी वादग्रस्त राहिला आहे. गुन्हा दाखल झाल्याने ऐन निवडणुकीत आ. मेहता अडचणीत आले आहेत.