शहर एसटी बचाव आंदोलनातून भाजपा बाहेर

By admin | Published: January 26, 2017 02:52 AM2017-01-26T02:52:54+5:302017-01-26T02:52:54+5:30

१ जानेवारीपासून एसटीने शहरी बस वाहतूक बंद केल्यानंतर एसटी बचावचा नारा देत आंदोलनाला सुुुरुवात केलेल्या भाजपाने गुरुवारच्या मोर्च्यातून माघार

BJP out of city ST protests | शहर एसटी बचाव आंदोलनातून भाजपा बाहेर

शहर एसटी बचाव आंदोलनातून भाजपा बाहेर

Next

शशी करपे / वसई
१ जानेवारीपासून एसटीने शहरी बस वाहतूक बंद केल्यानंतर एसटी बचावचा नारा देत आंदोलनाला सुुुरुवात केलेल्या भाजपाने गुरुवारच्या मोर्च्यातून माघार घेतली आहे. तो सरकारविरोधात असल्याचे कारण भाजपाने दिले आहे. दरम्यान १ एप्रिलपासून महापालिका परिवहन पर्यायी सेवा सुरु करणार आहे.
राज्य सरकारने १ जानेवारीपासून एसटीची वसईतील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेऊन वसईत एसटीची सेवा कायम ठेवावी, यामागणी एसटी बचाव आंदोलन समितीने गुुरुवारी वसईच्या तहसिल कचेरीवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बचावसोबतच २९ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, वसईतील कायदा-सुव्यवस्था आणि एमएमआरडीएच्या आराखड्याला विरोध अशाही मागण्या मोर्च्याच्या वतीने करण्यात येणार आहेत. मागण्या पाहता हा मोर्चा सरकारविरोधात असल्याने भाजपाने मोर्चा सामील न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपाचे वसई विरार जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी दिली.
एसटीची ग्रामीण भागात सेवा अविरतपणे सुरु रहावी, यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या दालनात एक बैठक संपन्न झाली. बैठकीला वसई विरार महापालिका आयुक्त सतीश लोखंडे, उपायुक्त किशोर गवस, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील, परिवहन आयुक्त, भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक, उपाध्यक्ष मनोज पाटील, महापालिका परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ उपस्थित होते. बैठकीत महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी डेपो आणि स्टँड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने अनेक अडचणी येत असल्याची व्यथा मांडली. एसटीने विरार, नालासोपारा आणि नवघर एसटी स्टँडची जागा भाडेतत्वावर दिल्यास परिवहनची अतिशय चांगली सेवा देता येईल, अशी माहिती दिली. त्यावर नागपूर आणि नांदेडच्या धर्तीवर वसई-विरार महापालिकेला एसटी भाडेतत्वावर जागा देण्यास तयार असल्याची माहिती एसटीचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांनी दिली. त्यावेळी येत्या दोन महिन्यात महापालिकेच्या ताफ्यात नव्या ७० बसेस दाखल होत आहेत. त्यानंतर महापालिका एसटीपेक्षा चांगली आणि अविरत सेवा ग्रामीण भागात देईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त लोखंडे यांनी दिली. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून एसटी बंद होऊन महापालिकेची परिवहन सेवा सुुरु होणार आहे.
बैठकीत भाजपाचे राजन नाईक यांनी चोवीस तास अविरत सेवा देणारी एसटी सुरु ठेवावी. सध्याची बससेवा ग्रामीण भागातच असल्याने शहरी बस वाहतूक हा शब्द काढून टाकावा अशी मागणी केली. मात्र, राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिका हद्दीतील बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वसई विरार अपवाद होऊ शकत नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली.
दरम्यान, एसटीचा विषय निकाली निघाला आहे. मोर्चेकरांनी वसईतील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवून पोलीस खात्यावर आरोप केले आहेत. त्याचबरोबर २९ गावे आणि एमएमआरडीएचा आराखडाविषयीही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे मोर्चा सरकारविरोधी असेच चित्र आहे. वसईतील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली नाही. वसईत पोलीस बळ कमी आहे. सरकारकडून पोलीस ठाणी वाढवण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. त्यामुळे पोलीस बळ वाढणार असल्याने पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षम होणार आहे.
२९ गावे महापालिकेत ठेवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुरुवारच्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: BJP out of city ST protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.