"मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज ठाकरे सरकारला आपली जागा दाखवून देईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:28 PM2021-09-15T17:28:50+5:302021-09-15T17:30:13+5:30
BJP News : केदारनाथ म्हात्रे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नी बोटचेपी भुमिका घेणाऱ्या ठाकरे सरकारच्या विरोधात घणाघाती टीका केली.
आशिष राणे
वसई :- ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी ओबीसी मोर्चा वसई विरार शहर जिल्ह्यातर्फे वसई तहसीलदार कार्यालया समोर बुधवार दुपारी जोरदार निदर्शने करण्यात आली. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व भाजपावसई विरार शहर जिल्ह्याचे अध्यक्ष राजन नाईक, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा चिटणीस संजोग यंदे, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य केदारनाथ म्हात्रे, वसई विरार शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेश पाटील यांनी केले.
यावेळी शेखर धुरी, जोगेंद्र प्रसाद चौबे,महेंद्र पाटील, उत्तमकुमार नायर,राजु म्हात्रे, प्रज्ञा पाटील,अभय कक्कड,निलेश राणे, गणेश पाटील,भुषण किणी आदि जिल्हा पदाधिकारी, मंडळांचे अध्यक्ष, ओबीसी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या निदर्शनांच्या वेळी केदारनाथ म्हात्रे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नी बोटचेपी भुमिका घेणाऱ्या ठाकरे सरकारच्या विरोधात घणाघाती टीका केली.
कोर्टाने पुन्हा पुन्हा संधी देऊनही सरकारने ओबीसींचा इंपेरिअल डाटा सादर न केल्याने महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटल्या शिवाय निवडणुका घेवू नये, ही सर्व राजकीय पक्षांनी केलेली एकमुखी मागणीही कोर्टात टीकली नाही आणि यामुळे आता ओबीसींच्या रिक्त जागांसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत व त्यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाल्याने अस्वस्थ ओबीसी समाज सरकारला आपली जागा दाखवून देईल असं केदारनाथ म्हात्रे यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले.
एकूणच राजन नाईक यांनीही आपल्या भाषणात ठाकरे सरकारवर चौफेर घणाघाती टीका करून हे आंदोलन ओबीसींना न्याय मिळेपर्यंत संपणार नाही तर ते अधिक तीव्र होईल असा इशारा दिला यावेळी वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी लेखी निवेदन देवून या सरकार विरोधी आंदोलन व निदर्शनाची सांगता संध्याकाळी झाली.