भाजपाची गद्दारी सहन करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:24 AM2018-05-26T02:24:10+5:302018-05-26T02:24:10+5:30
उद्धव ठाकरे: पालघरमधील सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका
पालघर : भाजपावाले म्हणताहेत बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना उरली नाही माझा त्यांना सवाल आहे भाजपा तरी वाजपेयींच्या काळातली कुठे उरली आहे. त्याकाळी पक्षातील ज्येष्ठांचा, कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा मान राखला जायचा. आता तर त्यांना मोडीत काढणारी भाजपा उरली आहे. पैशाचा माज आणि थैली शहा यांच्या तालावर नाचणारी भाजपा बनली आहे. आधी त्याचा विचार करा. बाळासाहेबांनी भाजपाचे अनेक वार, खंजीर सहन केलेत पण मी भाजपाची गद्दारी सहन करणार नाही. जशास तसे उत्तर देणार असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालघर येथील जाहीर सभेत दिला.
या भाजपाला महाराष्टÑात कुणी विचार नव्हते. शिवसेनेचेच बोट धरून युतीचा आधार घेऊन भाजपा येथे काँग्रेस गवतासारखी वाढली आणि आज त्याच शिवसेनेवर ती दुगाण्या झाडते आहे. पहिल्यांदा जेव्हा वाजपेयींचे सरकार केंद्रात सत्तेवर आले तेव्हा ते किती दिवस टिकेल, हे कुणालाच माहिती नव्हते अशा स्थितीत वाजपेयींचा बाळासाहेबांना फोन आला ते म्हणाले प्राप्त परिस्थितीत मी शिवसेनेच्या फक्त एकाच खासदाराला मंत्रीपद देऊ शकतो. त्यासाठी मला नाव सुचवा. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितले की आधी तुम्ही पंतप्रधान होणे व तुमचे सरकार स्थिर होते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.
शिवसेनेला एकही मंत्रीपद दिला नाही तरी चालेल, इतरांना खूश करण्यासाठी आमच्या कोट्यातील मंत्रीपदे देऊन टाका. असे आम्ही इमानदान आणि युतीधर्म पाळणारे आहोत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही आमच्या सुरेश प्रभुंना, डॉ. भामरेंना घेतले आम्ही थयथयाट नाही केला.
वाढवण बंदर आणि जेएसडब्ल्यू जेट्टी विरोधात येथील संघर्ष समिती ५ जूनला मोर्चा काढणार आहेत. त्यात आमचे हजारो शिवसैनिक सहभागी होती अशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री म्हणतात जर श्रीनिवास पराभूत झाला तर त्याला मातोश्रीचे दरवाजे बंद होतील. परंतु प्रत्यक्षात तो निवडून येणार आणि तुमची खुर्ची जाऊन तुमच्यासाठी दिल्लीचे दरवाजे कायमचे बंद होतील हे विसरू नका, असा टोला त्यांनी हाणला. श्रीनिवास आमच्याकडे आपणहून आला. नुसता नाही सहकुटुंब आला. आम्ही त्याला फोडला नाही. असा दावाही त्यांनी यावेळी केला.
तत्परता दाखवली नाही
भाजपाचा दुटप्पीपणा स्पष्ट करतांना ते म्हणाले, की श्रीनिवासची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झाली तरी भाजपाने जाहीर केले नाही. आणि काल ते निरंजन डावखरे भाजपात दाखल झाले. त्यांची पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी लगेच दाखल केली. ती निवडणूक आहे २५ जूनला आणि उमेदवारी कधी जाहीर २४ मे ला. जी तत्परता डावखरेंच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत दाखविली ती श्रीनिवासची उमेदवारी घोषित करण्याच्या बाबतीत का दाखविली नाही. ५० वर्षे झाली शिवसेनेत एक पक्ष, एक नेता, एक धोरण, एक निशाणी कायम आहे. परंतु भाजपामध्ये किती बदल झालेत. ते मुख्यमंत्र्यांनी पहावे. आदिवासी असलेला हा एक नवखा युवक त्याला पराभूत करण्यासाठी अख्ख्या सरकारची यंत्रणा राबते आहे. उत्तर प्रदेशातील भाडोत्री नेते प्रचाराला येताहेत. का बरं? तुमच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून का? अशी टिका त्यांनी केली.