विक्रमगडमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:37 AM2020-01-09T00:37:14+5:302020-01-09T00:37:26+5:30
५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमगड पंचायत समितीतील भाजपच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीने एकत्र लढा देत सुरुंग लावला आहे.
राहुल वाडेकर
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमगड पंचायत समितीतील भाजपच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीने एकत्र लढा देत सुरुंग लावला आहे.
भाजपला पंचायत समितीच्या १० गणांपैकी फक्त दोन जागांवर, तर जि.प.च्या ५ गटांमध्ये भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. यापूर्वी पंचायत समितीच्या ६ जागांवर आणि जि.प.च्या पाचही गटांमध्ये भाजपने विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत पक्षामध्ये असलेल्या मतभेदाचा फायदा अपक्ष (विकास आघाडी) व राष्ट्रवादी यांना होऊन विक्रमगड पंचायत समितीवर एकत्रितरीत्या ६ जागांवर अपक्ष (विकास आघाडी) व राष्ट्रवादी संयुक्त उमेदवार निवडून आले आहेत. या आघाडीने भाजपला पूर्णपणे शह दिला असून भाजपला पंचायत समितीच्या अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
तर जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष (विकास आघाडी)- १, शिवसेना- १, राष्ट्रवादी- ३ तर पंचायत समिती गणामध्ये अपक्ष (विकास आघाडी)- २, शिवसेना- १, राष्ट्रवादी- ४, माकपा- १, भाजपा- २ असे उमेदवार विजयी झाले आहेत.
विक्रमगड विधानसभेनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकालही भाजपच्या दृष्टीने धक्कादायक लागलेले आहेत. कारण या पंचायत समिती व पालघर जिल्हा परिषद भाजपची सत्ता होती. दरम्यान, ५ गटांसाठी व १० गणांच्या जागांसाठी एकूण ८६ उमेदवार रिंगणात होते. मात्र गेल्या निवडणुकीच्या मानाने या निवडणुकीत मतदारांनी संपूर्ण तालुक्यातून भरघोस प्रतिसाद दिल्याने ७०.८२ टक्के मतदान झाले.
>यापूर्वी भाजपला मतदारांनी एकहाती सत्ता देऊन पाहिले, मात्र हवा तसा विकास साधला गेला नसल्याने तसेच यापूर्वी भाजपला शह देण्याकरिता कुणीही मैदानात नव्हते, मात्र आता आम्ही मैदानात उतरलो असून आमच्या सामाजिक कामांमुळे जनतेने आम्हास पसंती दिली आहे. आज विकास आघाडी व राष्ट्रवादी मिळून पंचायत समितीच्या ६ जागांवर तर जिल्हा परिषदेच्या ४ जागांवर विजय प्राप्त झाल्याने आम्ही विक्रमगड पंचायत समितीवर आमचा सभापती व उपसभापती बसेल. तसेच आमच्यावर मतदारांनी जो विश्वास टाकलेला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जाहीरनाम्यामध्ये दिलेली सर्व विकासकामे करू. कोणत्याही प्रभागातील जनतेला नाराज करणार नाही, असे आश्वासन देतो.
-नीलेश सांबरे, अपक्ष उमेदवार
> विक्रमगड पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार
प्रभाग-उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
१) तलवाडा-सुनिता घाटाळ राष्ट्रवादी १७००
२) वेहेलपाडा-सुभाष भोये भाजप १३५०
३) चिंचघर-कांता सुतार अपक्ष ३२९७ (विकास आघाडी)
४) आलोंडा -विनोद भोईर अपक्ष २२४६ (विकास आघाडी)
५) दादडे-लाडक्या लहांगे माकपा १२५२
६) डोल्हारी खुं-अंजली भोये राष्ट्रवादी २७५०
७) कुंर्झे-नम्रता गवारी शिवसेना २३८२
८) करसुड-रु चिता कोरडा राष्ट्रवादी २२६०
९) जांभा-यशवंत कनोजा राष्ट्रवादी १९७३
१०) उटावली -मनोज बोरसे भाजप २३३२
>विक्र मगड जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार
प्रभाग -उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
1 - तलवाडा -भारती कामडी शिवसेना २७४१
2 - दादड-गणेश कासट राष्ट्रवादी ४५९६
3 - आलोंडा-नीलेश सांबरे अपक्ष ७१४७ (विकास आघाडी)
4 - कुंर्झे-ज्ञानेश्वर सांबरे राष्ट्रवादी ४१७६
5 - उटावली-संदेश ढोणे राष्ट्रवादी ४१२०