महाआघाडीतील विसंवाद भाजपच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:32 AM2020-01-06T05:32:30+5:302020-01-06T05:32:37+5:30

तिन्ही पक्ष एकत्र येऊ न शकल्याने, काही ठिकाणी त्यांनी परस्पर सहकार्याची; तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यातील हा विसंवाद भाजपच्याच पथ्यावर पडेल,

BJP's path to conflict in the frontline? | महाआघाडीतील विसंवाद भाजपच्या पथ्यावर?

महाआघाडीतील विसंवाद भाजपच्या पथ्यावर?

Next

पालघर : भाजपला रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांत महाआघाडी करण्याची घोषणा जरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली असली, तरी पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊ न शकल्याने, काही ठिकाणी त्यांनी परस्पर सहकार्याची; तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यातील हा विसंवाद भाजपच्याच पथ्यावर पडेल, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आघाडीच्या नेत्यांनी मात्र आमच्यातील समन्वय उत्तम असून निकालानंतर आम्ही एकत्र येऊ, असा दावा केला आहे.
पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या. शेवटच्या टप्प्यात काही प्रमुख नेत्यांनी हजेरी लावल्याने आठही तालुक्यांतील राजकीय वातावरण तापले. प्रचारातील एकमेव रविवारी कारणी लावण्यासाठी शेवटच्या दिवशी सभा, धावत्या बैठकांबरोबरच वाहनांवर लाउडस्पीकर लावून दिवसभर मतदारांना आवाहन केले जात होते.
या निवडणुकीच्या रणधुमाळीत २१९ उमेदवार आहेत. ५७ जागांपैकी तीन गटांत आणि ११४ गणांपैकी दोन ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. पालघर आणि डहाणू या दोन तालुक्यांत सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे या तालुक्यांचे जिल्हा परिषदेवर वर्चस्व राहील, हे स्पष्ट आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्यात सभा घेतल्या, तसेच धावते दौरे केले. त्याआधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत महाविकास आघाडीवर, त्यातही खास करून शिवसेनेवर तोफ डागली होती. वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवले, अशी टीका त्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना, फडणवीस यांना नियतीनेच बाहेर बसवले; भाजप जातीय राजकारण करीत आहे, असे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले. एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तसेच आदिवासी भागाचा विकास शिवसेनेनेच केल्याचे सांगितले.
वसई तालुक्याबाहेर बहुजन विकास आघाडीला सत्तेत वाटा देण्याची कोणत्याच प्रमुख पक्षाची तयारी नाही. तसेच त्या पक्षाने आधी भाजपला आणि नंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचा
मुद्दाही स्थानिक नेत्यांनी मांडला. त्यामुळे त्या पक्षासोबतही आघाडी झालेली नाही.
शिवसेनेचे ज्या तालुक्यांत वर्चस्व आहे, तेथे खास करून विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा वाटा देण्यास तो पक्ष तयार नाही. कम्युनिस्टांचे वर्चस्व असलेल्या डहाणू, तलासरीत त्या पक्षाने बविआशी मैत्री कायम ठेवली आहे.
काँग्रेसला सर्वच तालुक्यांत प्रचंड झगडावे लागणार आहे. भाजपची भिस्त कुणबी सेना आणि श्रमजीवी संघटनेवर आहे; तर आघाडीच्या नेत्यांनी जिजाऊ संस्थेला सोबत घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच एकसंध आघाडी उभी राहू शकलेली नाही.
>पक्षीय बलाबल
५७ गटांपैकी भाजप- २१, शिवसेना १६ (एका बंडखोर अपक्षासह), बविआ १०, माकप ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १
>तालुकानिहाय लढतींचे चित्र
पालघर तालुक्यात १२ गट असून येथे शिवसेनेचे बºयापैकी वर्चस्व आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बविआ, कम्युनिस्ट पार्टी यांचीही चांगली ताकद तालुक्यात आहे. मागील वेळी येथे शिवसेनेने ७, भाजपने ५, राष्ट्रवादीने २, बविआने २, माकपने २ आणि काँग्रेसने १ जागा जिंकली होती. विक्रमगड तालुक्यात पाच गटांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. येथे भाजप आणि सेनेत थेट लढत आहे. अन्य पक्षांचे उमेदवारही आपापल्या परीने लढत देत आहेत. मागील निवडणुकीत येथे भाजपने ४ तर शिवसेनेने एक जागा जिंकली होती. जव्हार तालुक्यात पाच जिल्हा परिषद गटात १४ उमेदवार आहेत. जव्हारमध्ये भाजपचे वर्चस्व असून शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेही चांगले अस्तित्व आहे. मागील निवडणुकीत भाजपने ३, शिवसेनेने १ आणि माकपने १ जागा जिंकली होती. डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२ गटांसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असे ६० उमेदवार आहेत. येथे या वेळी मोठी चुरस आहे. मागील निवडणुकीत भाजप ५, राष्ट्रवादी २, बविआ २, कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) २ आणि काँग्रेसने १ जागा जिंकली होती. तलासरीत जिल्हा परिषदेच्या पाच गटांत १९ उमेदवार लढतीत आहेत. या तालुक्यांत भाजप आणि माकपची जवळपास सारखीच ताकद आहे. मागील निवडणुकीत भाजपने ३ तर माकपने दोन २ जागा जिंकल्या होत्या. मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागांपैकी आसे गटात राष्ट्रवादीचे हबीब शेख, तर पोशेरा गटातून भाजपच्या राखी चोथे यांची बिनविरोध निवड झाली आहे. खोडाळा गटातून सेनेच्या दमयंती फसाळे आणि भाजप यांच्यात सरळ लढत होणार आहे. मागील वेळी राष्ट्रवादीने १, शिवसेनेने १ तर भाजपने १ जागा जिंकली होती. वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ गटांतून २३ उमेदवार रिंगणात आहेत. वाडा तालुक्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये कडवी लढत होत आहे. मागील वेळी येथे शिवसेनेने ४ तर भाजपने २ जागा जिंकल्या होत्या. वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ जागा असून या तालुक्यात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत बविआने ३, तर शिवसेनेने १ जागा जिंकली होती.

Web Title: BJP's path to conflict in the frontline?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.