वाडयात भाजपचा सेनेला धक्का
By admin | Published: June 28, 2017 03:05 AM2017-06-28T03:05:38+5:302017-06-28T03:05:38+5:30
कोका कोला कंपनीच्या सुरूवातीपासून असलेल्या शिवसेना प्रणीत कामगार युनियनला अखेरचा जयमहाराष्ट्र करून तिच्या कर्मचा-यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : कोका कोला कंपनीच्या सुरूवातीपासून असलेल्या शिवसेना प्रणीत कामगार युनियनला अखेरचा जयमहाराष्ट्र करून तिच्या कर्मचा-यांनी भाजप प्रणित युनियनचा झेंडा खांद्यावर घेतला. भाजपने या रुपाने सेनेला जोरदार धक्का दिला आहे. कोका कोला वाडा युनिटच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा प्रणीत अखिल भारतीय कामगार संघ या युनियनची स्थापना केली आहे. कर्मचारी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्याहस्ते गेट मिटिंगचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, भाजपचे भगवान चौधरी तसेच संघटनेचे सरचिटणीस सुहास माटे, चिटणीस विवेक घोलप, उपाध्यक्ष प्रशांत वर्तक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून कंपनी व्यवस्थापन करीत असलेला जुलूम, कामाची जबरदस्ती, विनामोबदला ड्युटी व्यतिरिक्त अतिरिक्त थांबवणे, प्रमोशन व पगारवाढीमध्ये चालढकळ तसेच बंद पडत चाललेल्या सोयी सुविधा यामुळे कंपनीमधील कर्मचारी खूप वैतागला होता. शिवसेनेच्या युनियनकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी भाजपाप्रणीत अखिल भारतीय कामगार संघटनेच्या युनियनचा झेंडा हाती घेण्याचा एकजुटीने निर्णय घेतला.
गेट मिटिंगनंतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व पदाधिकाऱ्यांनी कोका कोला व्यवस्थापनाबरोबर मिटिंग घेवून त्यांना स्टाफवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. व्यवस्थापनाने त्यांना यापुढे पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार यांनी वाडा कोका कोला कंपनीच्या समस्या सोडविण्यासाठी पाठीशी राहील असे सांगितले. भारतीय जनता पार्टी प्रणीत संघटना अस्तित्वात येण्यासाठी शेखर वैद्य, अतुल वाडेकर, राजेंद्र चौधरी, शरद चासकर, अमोल सावंत, प्रशांत माळूंजकरस व दत्तात्रय गावकर यांनी खूप परिश्रम घेतले.