सेनेने खाल्ली भाजपाची मते, कमळाची व्होट बँक फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:54 AM2018-06-05T03:54:58+5:302018-06-05T03:54:58+5:30
आधीच्या डहाणू आणि सध्याच्या पालघर मतदारसंघातील सर्वच पक्षांची जवळपास अडीच लाख मते शिवसेनेने प्राप्त केल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय चित्रच साफ बदलून गेले आहे.
- नंदकुमार टेणी
पालघर : आधीच्या डहाणू आणि सध्याच्या पालघर मतदारसंघातील सर्वच पक्षांची जवळपास अडीच लाख मते शिवसेनेने प्राप्त केल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय चित्रच साफ बदलून गेले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात विजयाचे समिकरण पुन्हा कसे जुळवायचे हा प्रश्न सर्वच पक्षांना पडला आहे.
डहाणू लोकसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये पालघर झाला. त्यामध्ये काँग्रेस, राष्टÑवादी भाजपा, बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी असे ठरलेले ५ पक्ष होते. जेव्हा काँग्रेस आणि राष्टÑवादीची आघाडी व्हायची तेव्हा एक पक्ष कमी व्हायचा तर शिवसेना आणि भाजप यांची युती असल्यामुळे आणि पालघर व डहाणू हे जागावाटपात भाजपाकडे असल्याने शिवसेनेने येथे आपला उमेदवार उभा करण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही त्यामुळे येथील लढत चौरंगी अथवा तिरंगीच होत असे. डाव्यांचा आणि बविआचा प्रभाव जिल्हयातील ३-३ तालुक्यात असल्याने ही लढत शक्यतो तिरंगीच व्हायची अशा स्थितीत शिवसेनेने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकीत आपला उमेदवार प्रथमच उभा करून या मतदारसंघातील मतांचे गणित आणि विजयाचे समिकरण बिघडवून टाकले आहे. त्यामुळे आता शिवसेना कुठल्या पक्षाची किती मते खाते याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. हे पाहता सेनेने सर्वाधिक मते भाजपची खाल्ली आहेत. त्यापाठोपाठ बविआ आणि डावे यांची मते वळविली आहेत. असे स्पष्ट होते. त्यामुळे आता या सर्वच पक्षांना आपल्या व्होटबँक अधिक मजबुत कराव्या लागणार आहेत. तसेच विजयाची समिकरणेही नव्याने जुळवावी लागणार आहेत.
१४च्या भाजपाच्या मतात निम्मी मते होती शिवसेनेची
या पोटनिवडणुकीत प्रत्येक पक्षाला पडलेली मते पाहिली तर लक्षात येते की शिवसेनेने सर्वाधिक मते भाजपाची त्यानंतर काँग्रेस व त्यानंतर बविआची खाल्ली आहेत. वनगा यांना जी ५३३२०१ मते १४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळाली होती ती सर्वच भाजपाची नव्हती तर त्यात शिवसेनेची जवळपास निम्मी मते होती. म्हणूनच गावितांना यांना यावेळी २७२७८२ मते मिळाली. ५३३२०१ मधून ही २७२७८२ मते वजा केली तर उरतात २६०४१९ आणि वनगा यांना २४३२१० मते मिळाली आहेत. २०१४ मध्ये बविआच्या जाधव यांना २९३६८१ मते मिळाली आहेत ती यावेळी २३३८३८ झाली आहेत. म्हणजे त्यात ५९८४३ ची घट झाली आहे. तसेच १४ मध्ये येथे काँग्रेसचा उमेदवारच नव्हता तर डाव्यांच्या उमेदवाराने ७६८९० मते मिळविली होती. तर पोटनिवडणूकीत त्यांना ७१७८७ मते मिळाली आहेत याचा अर्थ ५१०९ एवढी त्यांची मते कमी झाली आहेत.