जव्हार पंचायत समितीवर चार जागा मिळवत भाजपची सरशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:38 AM2020-01-09T00:38:37+5:302020-01-09T00:38:55+5:30
पालघर जिल्हा परिषदेच्या जव्हार तालुक्यात ४ गट आणि पंचायत समितीच्या ८ गणांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत जव्हार जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि माकप अशा चार पक्षांचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
हुसेन मेमन
जव्हार : पालघर जिल्हा परिषदेच्या जव्हार तालुक्यात ४ गट आणि पंचायत समितीच्या ८ गणांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत जव्हार जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि माकप अशा चार पक्षांचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. तर जव्हार पंचायत समितीवर पुन्हा एकदा ४ जागा मिळवत भाजपची सरशी झाली आहे.
शिवसेनेच्या गुलाब विनायक राऊत या कासटवाडी गटातून सलग दुसऱ्यांदा विजयी ठरल्या आहेत. माकपच्या मनीषा यशवंत बुधर या वावर गटातून आणि माजी जि.प. अध्यक्ष आणि भाजपच्या सुरेखा थेतले या न्याहाळे गटातून तर सुनीता कमळाकर धूम या राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच कौलाळे गटातून निवडून आल्या आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, माकप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक - एक जागा मिळाली आहे. मात्र, जव्हार पंचायत समितीवर पुन्हा एकदा भाजपच सरस ठरली आहे.
तर तालुक्यातील पंचायत समितीच्या ८ गणांसाठी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून ८ पैकी ४ जागा मिळविल्या आहेत. यामध्ये सुरेश कोरडा - न्याहाळे गण, विजया दयानंद लहारे - साकूर गण, अजित शिवराम गायकवाड - सारसून गण, दिलीप परशुराम पाडवी - कोरतड गण, तर दुसºया क्र मांकावर शिवसेना असून त्यांचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. कौलाळे गण चंद्रकांत रंधा, कासटवाडी गणातून मंगला कान्हात, पिंपळशेत गणातून मीरा गावित तर माकपाच्या ज्योती बुधर या वावर गणातून निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडीने भोपळाही फोडला नाही.