नाळा गावातील ४ मंदिरांच्या दानपेट्ट्या फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:24 AM2018-11-30T00:24:28+5:302018-11-30T00:25:08+5:30
सलग दोन दिवस परिसरात घरफोड्या : यापूर्वीही झाल्या होत्या याच मंदिरात चोऱ्या
वसई : नालासोपारा पश्चिम येथील नाळा गावातील चार मंदिरातील दानपेट्या गुरूवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून फोडल्या. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
नाळा येथे अर्नाळा-वसई राज्य मार्गाला लागून श्रीराम मंदिर, श्री दत्त मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे असून, थोड्या आडमार्गावर देवीच्या वाडीतील निर्जन स्थानी ग्रामदेवता पद्मावती देवीचे मंदीर आहे. या चारही मंदिरात गुरूवारी सकाळी पूजाअर्चेसाठी ग्रामस्थ आले असता मंदिराचा कडी-कोयंटा उचकटून गाभा-यातील दानपेट्या फोडलेल्या आढळून आल्या. यातील श्रीराम मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर चोरट्यांनी टाकली होती, तर श्री दत्त मंदिरातील दानपेटी चोरटे सोबत घेऊन गेले आहेत. या चारही मंदिरातील दानपेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे सांगण्यात आले. तसेच या परिसरातील काही नागरिकांच्या महागड्या सायकलीही चोरीला गेल्या आहेत. याबाबत नालासोपारा पोलिस ठाण्यात श्री पद्मावती देवी मंदिर ट्रस्टकडून तक्रार दाखल केली असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याच श्रीराम मंदिर व पद्मावती देवी मंदिरात पाच वर्षापूर्वीही चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या होत्या, अशी माहिती श्रीपद्मावती देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी लोकमतला दिली.
निर्मळ यात्रोत्सव काळात चोरीच्या प्रमाणात वाढ
दरवर्षी निर्मळ यात्रोत्सवाच्या कालावधीत चोरी व घरफोडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या यात्रोत्सवाच्या काळात शेकडो लोक बाहेरगावाहून येऊन पंधरा दिवस मुक्काम करतात.यात विविध खेळण्यांची दुकाने,मोठे पाळणे, तसेच मनोरंजनाचे खेळ लावणारे बाहेरगावचे लोक येऊन राहत असतात. यातील काही लोक भुरट्या चो-या करीत असून पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात भंगार विक्रेते येणा-यांवरही नागरिकांचा संशय आहे.