चाळींसाठी नाला गायब
By admin | Published: May 31, 2016 03:01 AM2016-05-31T03:01:57+5:302016-05-31T03:01:57+5:30
तुंगारेश्वर पर्वतावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेला शंभर फुटी नालाच भूमाफियांनी गायब केल्याचा प्रकार उजेडात आला आहे
वसई : तुंगारेश्वर पर्वतावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेला शंभर फुटी नालाच भूमाफियांनी गायब केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याठिकाणी असलेल्या आदिवासी जमिनींवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर बेकादा चाळी बांधत असलेल भूमाफियांनीच हा नाला गायब केल्याचे उघडकीस आले आहे. याची महापालिकेने चौकशी सुरु केली असून अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही.
वसई फाटा येथील मनीचापाडा रिचर्ड कंम्पाऊंड येथे हा नाला होता. अनाधिकृत बांधकामांना तो अडथळा ठरत असल्याने तो ९० फूट बुजवून केवळ १० फुटी कृत्रिम नाला बांधण्यात आला आहे. आजूबाजूचा पूर्ण परिसर हा डोंगराने व्यापलेला आहे. पावसाळ्यात याच डोंगराचे पाणी या नाल्यातून संमुद्राला मिळत होते. परंतु शंभरफ़ुटी नैसर्गीक नालाच भूमाफ़ियांनी बुजवल्याने पावसाळ्यात येथील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गा नजीक वसई फाटा जवळ रिचर्ड कंम्पाऊंड मधील मणीचा पाडा ते जबारपाडा हा परिसर पूर्णपणे भूमाफियांनी व्यापला आहे. मौजे पेल्हार मनीचा पाडा सर्व्हे नं. ९६ ही जमीन मिळकत अदिवासी शेतकऱ्यांची आहे. पेल्हार डॅम ते रिचर्ड कंम्पाऊंड पर्यंत शंभर फ़ुटी नैसर्गीक नाला होता. परंतु या परिसरात चाळ माफियांनी अतिक्रमण करुन हा नैसर्गिक नाला माती, रॅबीट आणी दगड टाकून बुजवला आहे. नैसर्गिक नाला कळु नये यासाठी भूमाफियांनी बाजुलाच सिमेंटचा दहा फुटी नालाही बांधला आहे. या परिसराच्या बाजुला तुंगारेश्वर अभयारण्य आहे. येथील डोंगराचे पाणीही याच नाल्यातून वसई मार्गे समुद्राला मिळत होते. शंभर फ़ुटी नाला बुजल्याने पेल्हार, मणीचापाडा, रिचर्ड कंम्पाऊंड, जबारपाडा, वसई फ़ाटा, यासह अन्य परिसराला पुराचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आजूबाजूची शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसानही होण्याची दाट शक्यता आहे.
(प्रतिनिधी)