पालघरमधील रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 01:50 AM2021-04-04T01:50:39+5:302021-04-04T01:50:58+5:30
रक्तदानासाठी पोलीस पुढे सरसावले
- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रक्तदान शिबिरासाठी रक्तदाते पुढे येत नसल्याने जिल्ह्यातील ब्लड बँकांतील रक्तसाठा केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. रक्ताची मागणी वाढत असताना जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालय या एकमेव शासकीय ब्लड बँकेत अवघ्या ३३ रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत. दरम्यान, रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे आपल्या पोलीस दलासह पुढे सरसावले आहेत.
जिल्ह्यात निर्माण झालेल्या रक्तसाठ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सहा ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक शैलेश काळे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आजवर एकूण ५१ हजार ९६५ बाधित रुग्ण झालेले आहेत. शनिवारी त्यात ५८५ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत १ हजार २३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे उपचारादरम्यान रक्ताची आवश्यकता भासत असून जिल्ह्यातील ७ ब्लड बँकेत २ ते ३ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्ताची निर्माण झालेली टंचाई भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे जास्तीत जास्त आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पालघर पोलीस अधीक्षक शिंदे यांनी पालघर पोलीस दलामार्फत पालघर, बोईसर, डहाणू, कासा, तलासरी, जव्हार या क्षेत्रात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबिरात त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस मित्र, नागरिक यांनी आपला सहभाग नोंदवून रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपाधीक्षक काळे यांनी केले आहे.
शासकीय ब्लडबँकेत ३३ बॅगा
पतंगशाहा कॉटेज हॉस्पिटल, ब्लड बँक जव्हार या शासकीय ब्लड बँकेत अवघ्या ३३ पिशव्या शिल्लक आहेत. मागच्या महिन्यात १७८ रक्त बॅगा रुग्णांना वाटप करण्यात आल्या असल्याचे ब्लड बँकेकडून सांगण्यात आले. या भागात महिलांच्या प्रसूतीच्या संख्या जास्त असून त्यांच्यासह अन्य भागातून रक्ताची मागणी झाल्यास पुरवठा केला जात असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
लोकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन
लसीकरणाआधी डिसेंबर, जानेवारीत झालेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने २०० ते २५० रक्त पिशव्या जमा व्हायच्या. लोकांनी आपला सहभाग नोंदवणे गरजेचे असून फक्त शासकीय रक्तपेढ्यांनी आयोजित रक्तदान शिबिरातच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे हा शासन आदेश बदलून सर्वच ब्लड बँकेच्या रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान करण्याची मुभा त्यांना द्यावी, अशी मागणी डी.के. छेडा ब्लड बँकेचे चेअरमन विजय महाजन यांनी केली.
लसीकरणाआधी मी केले रक्तदान
लसीकरणाआधी रक्तदान करण्याचे आवाहन केले जात असून महाराष्ट्र ब्लड बँक, पालघरच्या चेअरमन लिनीट चव्हाण यांनी जिल्ह्यात रक्ताची मोठी टंचाई निर्माण झाल्याने लसीकरण करण्याआधी नागरिक, राजकीय पक्षप्रतिनिधी आणि तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात सात ब्लड बँका
डी.के. छेडा ब्लड बँक, डहाणू - ८ पिशव्या
महाराष्ट्र ब्लड बँक, पालघर - ०
डी.के. छेडा ब्लड बँक, नालासोपारा - ०
सरला ब्लड बँक
आणि विजय ब्लड बँक, वसई - ५०
बीएआरसी ब्लड
बँक, बोईसर - ०
पतंगशाहा कॉटेज हॉस्पिटल ब्लड बँक, जव्हार - ३३