बोअरस्फोटामुळे परशुराम मंदिराला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 12:52 AM2021-01-08T00:52:07+5:302021-01-08T00:52:12+5:30
कूपनलिका, विहिरींचेही होत आहे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील गुंजकाटी येथे श्रीपरशुरामाचे पुरातन व ऐतिहासिक मंदिर असून या मंदिराशेजारी असणाऱ्या दगडखाणीत दररोज बोअरस्फोट केले जात आहेत. या जोरदार धक्क्यांमुळे मंदिराला धोका निर्माण झाला असून गावातील ग्रामस्थांच्या घरांनाही तडे गेले आहेत. त्यातच विहिरी व कूपनलिकेचेही नुकसान होत असल्याने बोअरस्फोट बंद करण्याची मागणी गुंज येथील ग्रामस्थांनी वाड्याच्या तहसीलदारांकडे केली आहे.
तालुक्यातील गुंज गावाच्या हद्दीत अनेक दगडखाणी असून या दगडखाणीत दगडाचे उत्खनन करण्यासाठी बोअरस्फोट केले जातात. एका बोअरस्फोटामुळे जास्त दगडाचे उत्खनन होत असल्याने दगडखाण मालक शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बोअरस्फोटाची परवानगी नसतानाही स्फोट खुलेआमपणे करीत आहेत. त्यामुळे गुंज गावातील पुरातन मंदिराला तडा गेला असून ते पडण्याची भीती ग्रामस्थांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.
बोअरस्फोटामुळे भूगर्भात बदल होत असल्याने गावातील विहिरी कोसळून पडण्याची तर कूपनलिकेतील पाणी गायब होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पुरातन परशुराम मंदिराच्या सुरक्षिततेसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या तक्रारींवर गुंज गावातील सुमारे ५२ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दगडखाणीतील बोअरस्फोटामुळे माझ्या शेतावरील कूपनलिकेचे पाणी अचानक गायब झाल्याने आता मला भाजीपाला वगैरे लागवडीसाठी दुसऱ्या गावाचा आसरा घ्यावा लागला आहे.
- संजय भोईर, ग्रामस्थ, गुंज
चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
सुनील लहांगे,
नायब तहसीलदार, वाडा