कामगारांना घेऊन जाणारी बोट वैतरणा खाडीत बुडाली; 2 जण गेले वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 07:30 AM2023-11-21T07:30:05+5:302023-11-21T07:49:33+5:30

दोन वाहून गेले; २२ जणांना वाचविले, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांमुळे दुर्घटना

Boat carrying workers sinks in Vaitrana Bay; 2 people were carried away | कामगारांना घेऊन जाणारी बोट वैतरणा खाडीत बुडाली; 2 जण गेले वाहून

कामगारांना घेऊन जाणारी बोट वैतरणा खाडीत बुडाली; 2 जण गेले वाहून

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/सफाळे : मुंबई-बडोदा महामार्गावर वैतरणा खाडी पूल उभारणीच्या कामावर जाणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या कामगारांची बोट खाडीत बुडाली. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत दोन कामगार बुडाले. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. स्थानिकांच्या मदतीने २२ कामगारांना वाचविण्यात यश आले. 

दुर्घटनेत आदर्श मिश्रा आणि निर्मल शुक्ला हे दोन कामगार खाडीत गेले तर हाफीज उल इस्लाम (४०), सोहेल खान (२१), मासूम शेख (२२) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तहसीलदार रमेश शेंडगे तसेच केळवे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तत्काळ शोधकार्य सुरू केले आहे. मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी व वाडा या पाच तालुक्यांतून जातो. या महामार्गाची लांबी १०७.१३ किलोमीटर इतकी आहे. वैतरणा खाडीत पुलाचे सात खांब उभारणीचे काम जीआर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनी करत आहे.

बोटीत नेमके किती कामगार होते?
अपघाताची माहिती मिळाल्यावर उपविभागीय महसूल अधिकारी सुनील माळी, तहसीलदार सुनील शेंडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी, केळवे सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी भीमसेन गायकवाड, बंदर अधिकारी नवनीत निजाई, प्रसाद पारकर, सफाळे पोलिस ठाण्याचे निरीक्षक मांदळे आदींनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले होते.
ही घटना केळवे सागरी पोलिस आणि वसई सागरी आयुक्तालयाच्या मांडवी पोलिस ठाण्याच्या सीमेवर घडली असूनही मांडवी पोलिस ठाण्याचा एकही जबाबदार पोलिस घटनास्थळी उपस्थित नव्हता. नेमके किती कामगार बोटीत होते, याबाबत जयेश इंटरप्रायजेस या ठेकेदार कंपनीला माहिती नसल्याने कामगारांची संख्या लपविण्याचा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. 
केळवे सागरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी कामगारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू 
केले आहे.

 सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रात्रपाळी केलेल्या कामगारांना आणण्यासाठी व २२ ते २५ कामगारांना प्रकल्पस्थळी नेण्यास बोट जात होती. नेहमीची अधिक क्षमतेची बोट बंद पडल्याने कमी क्षमतेची व कामगारांना लाइफ गार्ड न देताच ही बोट जात होती. ओहोटीच्या प्रवाहात वाढीव-वैतीपाडादरम्यान बोट बुडाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Web Title: Boat carrying workers sinks in Vaitrana Bay; 2 people were carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर