वसईच्या समुद्रात बोट उलटली; एकजण मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:44 PM2020-01-04T15:44:22+5:302020-01-04T15:45:47+5:30
अचानक आलेल्या लाटेच्या तडाख्यामुळे यात साध्या बोटीला खडकाची धडक लागून बोट समुद्रात पलटी झाली.
वसई - वसईच्या रानगाव येथून पोशापीर खडक असलेल्या बेटावर समुद्रात फिरायला गेलेल्या तरुणांची बोट खडकाला धडकून उलटल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेत स्टीवन कुटिनो या 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य 5 जणांची सुखरूप सुटका झाली असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी लोकमत ला दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास वसई, रानगाव आणि गिरिज येथे राहणा-या सहा मित्रांचा एक ग्रुप फिशिंगसाठी समुद्रात निघाला होता. यासाठी एक साधी बोट व एक मशीनची अशा दोन बोटी घेऊन ते भल्या पहाटे रानगावहून समुद्रात निघाले होते.
समुद्रात फिशिंग करून झाल्यानंतर ही टीम दुपारी 3 च्या सुमारास पोशापीर खडक बेटाच्या येथून परतत असताना अचानक आलेल्या लाटेच्या तडाख्यामुळे यात साध्या बोटीला खडकाची धडक लागून ती बोट समुद्रात पलटी झाली. दुसऱ्या बोटीत असलेल्या मित्रांनी या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला दोघांना वाचवण्यात यश आले.
मात्र स्टीवन कुटिनो (37 ) रा,गिरीज या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर आशुतोष या तरुणाच्या पोटात पाणी गेल्याने त्याला उपचारांसाठी वसईच्या डी.एम. पेटिट रुग्णाल्यात दाखल करण्यात आले. या एकूणच घटनेची माहिती वसई पोलीस ठाणे, अग्निशमन टीम आदींना समजल्यावर या रेस्क्यू टीमने यातील 5 जणांना सुखरूप व सुरक्षित स्थळी आणले,मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला. स्टीव्हन याच्या मृत्यू ने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.