सातपाटीतील बोट दुरुस्ती यार्ड, लिलावगृह गेले ‘चोरीला’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 12:32 AM2020-12-18T00:32:12+5:302020-12-18T00:32:19+5:30
लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार करणार
- हितेंन नाईक
पालघर : केंद्रीय कृषी योजनेअंतर्गत सातपाटी येथे मच्छीमार बांधवांसाठी मासेमारी केंद्र विकसित करण्यासह सुविधा पुरवण्यासाठी देण्यात आलेल्या ८ कोटी ४७ लाख ५१ हजार ७३४ रुपयांतून उभारलेली अनेक बांधकामे चोरीला गेल्याची गंभीर बाब ज्येष्ठ मच्छीमार नेते तथा माजी सरपंच सुभाष तामोरे यांनी निदर्शनास आणली आहे. याबाबत आपण लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय कृषी योजनेअंतर्गत सातपाटी येथे ९०० मीटर्सची बार्फ वॉल बांधण्याच्या कामासाठी ५ कोटी ८ लाख, खाडीतील ५३ हजार २०० क्युबिक मीटर्स साचलेला गाळ काढण्यासाठी ८८ लाख ८१ हजार, बोट दुरुस्तीसाठी २० मीटर्स बाय १५ मीटर्स यार्ड बांधण्यासाठी १५ लाख ९२ हजार, ३० मीटर्स बाय २० मीटर्स रुंदीचे लिलावगृह बांधण्यासाठी ९१ लाख ४१ हजार, लिलावगृहासाठी जागा विकसित करण्यासाठी संरक्षित भिंत बांधणे, नाल्याचा मार्ग दुरुस्त करण्यासाठी ७७ लाख ४३ हजार, मच्छीमारांची जाळी विणण्याची शेड उभी करण्यासाठी २२ लाख ४४ हजार, मासे सुकविण्यासाठी ओटा तयार करण्यासाठी १० लाख ८७ हजार आदी कामांसाठी राज्य शासनाच्या सहायक पतन अभियंता कार्यालय, ठाणे या विभागामार्फत एकूण ८ कोटी ४७ लाख ५१ हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले होते. या कामाचा ठेका डहाणू येथील अंकिता इंटरप्रायजेस या ठेकेदाराला देण्यात आला होता. या ठेकेदाराने सोसायट्यांच्या विरोधामुळे लिलावगृह आणि स्थानिक अडचणीमुळे संरक्षक भिंत बांधण्यात आली नसल्याव्यतिरिक्त इतर सर्व कामे अपूर्ण करण्यात आल्याची माहिती सुभाष तामोरे यांनी पतन विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या माहितीतून देण्यात आलेली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची बिलेही ठेकेदाराला अदा करण्यात आलेली असल्याचे कळविले आहे.
सातपाटी येथे उभारण्यात आलेल्या कामांपैकी अनेक कामांची पूर्तता झाली नसून होड्यांच्या दुरुस्तीसाठी शेड बांधण्यात आली नसून खाडीतील गाळ काढणे, लिलावगृहासाठी जागा विकसित करणे, गटार बांधकामे ही कामे झालीच नसल्याचे सुभाष तामोरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंकिता इंटरप्रायजेसचे ठेकेदार निमिल गोहेल यांच्याशी संपर्क साधला असता पूर्ण अंतिम देयक देणे बाकी असून मला फक्त ६ कोटींची बिले देण्यात आली आहेत. लिलावगृह आणि उघडा निवारा या कामाऐवजी अन्य कामे मत्स्यव्यवसाय विभागाकडे प्रस्तावित करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
ज्या अधिकाऱ्याने काम पूर्ण झाल्याचे वरिष्ठ कार्यालयाला कळवल्याने ठेकेदारांची कोट्यवधींची बिले काढण्यात आली, त्याविरोधात आणि शासकीय निधीची लूट केल्याप्रकरणी आपण पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे तामोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तक्रार करणार
सद्यस्थितीत घटना स्थळावर होड्यांची यार्ड दुरुस्ती शेड आदी बाबी पूर्ण करण्यात आली असतील तर ती अस्तित्वात असणे आवश्यक असताना ती दिसून येत नसल्याने या कामाची चोरी कुणी
केली? यासाठी आपण तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.