पालघर जिल्ह्यातील बोटी मासेमारीसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:17 AM2019-08-12T01:17:25+5:302019-08-12T01:17:49+5:30
मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील वसई ते झाई - बोर्डी भागातील हजारो बोटी १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यास सज्ज आहेत.
पालघर - मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील वसई ते झाई - बोर्डी भागातील हजारो बोटी १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यास सज्ज आहेत. समुद्रातील वातावरण ३ आॅगस्टपर्यंत धोकादायक राहणार असून हा कालावधी लांबण्याची शक्यता आहे.
मासेमारीसाठी संपूर्ण किनारपट्टी सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सातपाटी, मुरबे, डहाणू, वसई, अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर आदी बंदरातून मासेमारीसाठी २ ते ३ हजार बोटी मासेमारीसाठी रवाना होण्यापूर्वी विधिवत पूजा, मुहूर्त करून सज्ज झाल्या आहेत.
नौकांची डागडुजी, रंगरंगोटी, नवीन जाळी खरेदी करून त्यांना दोरखंड, नोकर, तांडेल यांचा पगार निश्चित करणे आदी कामेही पूर्ण केली आहेत. सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेने ४५० टन तर मच्छिमार सहकारी संस्थेने ३०० टन बर्फाचे उत्पादनही केले आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने पापलेट, घोळ, दाढा, बोंबील असे मासे हजारोंच्या संख्येने थव्याथव्याने किनाऱ्याच्या जवळपास फिरत असतात. याचा फायदा उचलत गिलनेट व डोलनेट, वागरा आदी जाळ्यात त्यांना पकडण्यासाठी बोटमालक उत्सुक असतो.