खानिवडेतील अभिषेकचा मृतदेह तानसात सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:14 AM2017-08-13T03:14:51+5:302017-08-13T03:14:51+5:30
खानिवडे गावातून दोन किशोरवयीन मुले १० आॅगस्ट पासून घरातून कोणासही काही एक न सांगता अचानक गायब झाली होती . त्यापैकी अभिषेक पंडित पाटील (१५) याचा मृतदेह
पारोळ : खानिवडे गावातून दोन किशोरवयीन मुले १० आॅगस्ट पासून घरातून कोणासही काही एक न सांगता अचानक गायब झाली होती . त्यापैकी अभिषेक पंडित पाटील (१५) याचा मृतदेह गावच्याच हद्दीतील तानसा नदीच्या किनारी १२ आॅगस्ट रोजी सापडला. मात्र १३ वी मध्ये शिकणाºया दीपक दिलीप कोळी (१८) याचा ठाव ठिकाण अजूनही लागला नसून त्याचा शोध पोलिसांसह त्याचे नातेवाईक घेत आहेत .
दरम्यान जिथे हा मृतदेह आढळला त्या ठिकाणापासूनच्या वरील दो किलोमीटरच्या किनारी परीसरात त्यांचे कपडे, दीपकचा मोबाईल व चपला आढळून आल्याने दोघेही नदीत उतरल्याचे दिसत असून अभिषेकचे प्रेत सापडल्याने दोघेही बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एकमेकांच्या घराजवळच राहणारी व नात्याने मावसभाऊ असलेली ही दोन्ही मुले शांत व अतिशय मनमिळावू होती.
मात्र त्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिषेकचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील गोसावी करत आहेत.
मात्र हे दोघे नदीकिनारी कशासाठी गेले? नदीचा प्रवाह आणि खोली याची माहिती असताना ते पाण्यात उतरले कसे? या प्रश्नांची चर्चा सध्या या परीसरात होते आहे. त्यांचा मृत्यू अपघात की घात या बाबतही असंख्य तर्क-वितर्क लढविले जात आहेत.