वसईत बोगस बाटलीबंद पाण्याचा धंदा जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:17 AM2020-09-06T00:17:42+5:302020-09-06T00:18:08+5:30
नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जातोय खेळ
पारोळ/नालासोपारा : वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोगस धंदा सुरू असून मागील वर्षी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने ५१ पाणी विक्रेत्यांवर गुन्हा नोंद केला होता. तरीही आजही अनेक ठिकाणी असे कारखाने सुरू असून या बाटलीबंद पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पांतून फार्मासिस्ट मायक्रोबायोलॉजिकल पाणी शुद्ध तपासणी प्रयोगशाळाच गायब असल्याची माहिती मिळत आहे. वसई तालुक्यात कामण, सातिवली, धानीव, पेल्हार, वसई फाटा, बावखळ, विरारफाटा, शिरसाड, राजावली, जूचंद्र, बाफाने, वाकीपाडा अशा अनेक भागांत बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प सक्रिय आहेत. या प्रकल्पांत पाण्याची शुद्धता तपासण्याची यंत्रेच गायब आहेत. पाणी शुद्धतेसाठी पाण्यावर १४ प्रक्रिया व २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियम या प्रकल्पांत पायदळी तुडवला जात आहे. याबाबत अन्न आणि प्रशासन विभाग उदासीन असल्याने वसईत बाटलीबंद धंद्याला जोर चढला आहे.
अशुद्ध पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये डिसल आॅक्सिजन, हार्डनेस पीएच, ओडर कलर, जिवाणूची स्थिती, पाण्यातील जडपणा, आदींचा समावेश असतो. या प्रकल्पांत प्रयोगशाळा हाताळणारी जबाबदार व्यक्ती गरजेची असते, तसेच पाण्यातील क्षार, विषाणू, घातक द्रव्य बाजूला काढण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात असल्याचे दिसून येत नाही. हा बोगस धंदा करताना ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बाटलीची पॅकिंग मात्र चांगल्या दर्जाची केली जाते.
महानगरपालिका हद्दीतील ज्याज्या परिसरात अनधिकृत पाण्याचे प्लाण्ट आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाई करून संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील. या आधीही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
- सुखदेव दरवेशी, आरोग्य अधिकारी, वालीव प्रभाग, वसई-विरार महानगरपालिका