बोगस दस्तावेज, शिक्के गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:27 PM2019-06-12T23:27:53+5:302019-06-12T23:28:30+5:30
उधवा ग्रामपंचायतीतील वास्तव : प्रकरण तलासरी पोलीस ठाण्यात
तलासरी : उधवा ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नोंदपुस्तक, शिक्के व महत्त्वाचे दस्तऐवज बनवट बनवून ते बनावट असल्याचे माहिती असतांनाही कब्जात बाळगून ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात उधवा ग्रामपंचायतमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामविकास अधिकारी गणपत गवळी यांनी तलासरी पोलिस ठाण्यात ही तक्र ार केली असून तक्र ारीत असे नमूद करण्यात आले आहे की उधवा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नं. १५०/३ क्षेत्र ०.३१.० मध्ये बांधकामासाठी परवानगी दिल्याबाबत देवराम कुरकुटे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. त्याआधारे देण्यात आलेल्या कागदपत्रांची ग्रामपंचायत इतिवृत्तामध्ये पडताळणी केली असता सदर सर्व्हेे नंबर करीता वाणिज्य व रहिवासी प्रयोजनार्थ बांधकाम परवानगी देण्यात आली नसल्याचे आढळून आले. तसेच ग्रामपंचायतकडे सादर केलेल्या नाहरकत दाखल्यावर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खोटी सही शिक्क्याचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे गुलाब बाबू धांगडा ही महिला सरपंच नसतांना तिच्या खोट्या सहीचा वापर करून नाहरकत दाखला तयार केल्या असल्याचे आढळून आल्याने ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बजरंगबली गुलाबचंद शहा व बबलू बिहारी गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तलासरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बनावट कागदपत्रे बनविणारी टोळी कार्यरत
उधवा ग्रामपंचायत हद्दीतील बनावट अकृषिक प्रमाणपत्राच्या आधारे मशिदीचे बांधकाम करण्याचे प्रकरण ताजे असून त्याबाबतही तलासरी पोलिसामार्फत तपास करण्यात येत आहे. बनावट कागदपत्रे, शिक्के, सही यांचा वापर करून जमिनी फेरफार, जमीन विक्र ी, जमीन बिनशेती करणे अशी प्रकरणे उजेडात येत असून पालघर जिल्ह्यात बनावट कागदपत्रे तयार करणारी मोठी टोळी सक्रि य आहे. त्याचप्रमाणे बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी स्थानिक शासकीय व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही सामील असावेत.