बोईसरला उद्योजकांनी केली वीजबिलांची होळी
By admin | Published: July 5, 2016 02:38 AM2016-07-05T02:38:07+5:302016-07-05T02:38:07+5:30
तारापूर एमआयडीसीतील उद्योजकांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर टीमा तर्फे मोर्चा काढून वीज बिलांची होळी केली
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील उद्योजकांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर टीमा तर्फे मोर्चा काढून वीज बिलांची होळी केली व प्रस्तावीत वीज दरवाढीला स्थगिती देण्याची मागणी केली आणि दरवाढ रद्द न केल्यास मोठया आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
टीमा कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चा मध्ये वेलजी गोगरी, उदयन (संदीप) सावे, जगन्नाथ भंडारी, अजित राणे, निलेश पाटील, रमाकांत चौधरी, जान इ. सह अनेक जण सहभागी झाले होते.
महावितरण आयोगाने जून २०१५ पासून निश्चित केलेले औद्योगिक वीजदर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेत २५ टक्के ते ४० टक्क्यांनी जास्त आहेत. अवाढव्य इंधन समायोजन आकारामुळे हे दर आत्ताच दिडपट झालेले आहेत. घरगुती, व्यापारी व शेतकरी ग्राहकांचे वीजदर ही देशातील सर्वाधिक पातळीच्या जवळपास पोहचले असून यामध्ये पुन्हा सरासरी १९ टक्के व चौथ्या वर्षी २७ टक्के दरवाढ लादणारा व ४ वर्षात ग्राहकांवर ५,६,३७२ कोटी रूपये ची दरवाढ करणारा प्रस्ताव महावितरण कंपनीने आयोगासमोर दाखल केला असुन ही दरवाढ राज्याच्या विकासासाठी अत्यंत घातक ठरणारी आहे त्यामुळे संपूर्ण दरवाढ रद्द करावी अशी मागणी आज दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
(वार्ताहर)
प्रस्तावित वीज दर वाढीमुळे उद्योगांना इतर राज्यांचे उद्योग व आंतरराष्ट्रीय उत्पादनाबरोबर स्पर्धा करणे कठीण होईल पर्यायाने उत्पादन कमील होऊन महाराष्ट्र राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे विद्यमान सरकारने एम.एस.इ.डी.सी.ला प्रस्तावित वीज दरवाढीचा अर्ज महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे देण्याची अनुमती द्यायला नको होती सरकार नेमके या गोष्टीचा अभ्यास करते काय या विषयी जन मानसांमध्ये शंका व प्रचंड संताप आहे. प्रस्तावित वीज दरवाढ ही रद्द केलीच पाहिजे अशी सर्व उद्योजकांची एकमुखी मागणी आहे.