डम्पिंगवरून बोईसर-कोलवडे आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:08 AM2017-10-06T01:08:14+5:302017-10-06T01:11:31+5:30
शेतक-यांसाठी असलेल्या रस्त्यावर दुतर्फा टाकण्यात येणारा घन कचरा आणि त्यातून येणारी दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या कोलवडे
बोईसर : शेतक-यांसाठी असलेल्या रस्त्यावर दुतर्फा टाकण्यात येणारा घन कचरा आणि त्यातून येणारी दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या कोलवडे ग्रामपंचायतीने बोईसरसह इतर ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यास विरोध केला असून १ आॅक्टोबर पासून डम्पिंग ग्राऊंडचा रस्ताच बंद केला आहे. या प्रकारामुळे बोईसरसह इतर ग्रामपंचायत परिसरात कचरा साठून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत कचरा उचलू शकणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बोईसर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोणताही औद्योगिक कारखाने नसले तरी येथील नागरी घन कचरा बोईसर ग्रामपंचायत कोलवडे ग्रामपंचायतीच्या हद्दित असलेल्या एमआयडीसीच्या जागेत टाकता. परंतू मागील एक वर्षापासून ग्रामपंचायत कोलवडे यांनी सदर ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर लोखंडी गेट उभा करून अधून मधून लॉक लाऊन कचरा टाकण्यास मज्जाव केला आहे. त्यानंतर १ आॅक्टोबर २०१७ पासून या ठिकाणी गेटला लॉक लाऊन कचºयाच्या गाड्या जाण्याचा मार्गच बंद करण्यात आला आहे.
४ सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोलवडे ग्रामपंचायतीने संबधीत ग्रामपंचायतीना ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देऊन तो पर्यंत पर्यायी व्यवस्था करा अन्यथा १ आॅक्टोबर पासून गेट बंद करून कचरा टाकण्यास मज्जाव करण्या संदर्भातील पत्र पालघरच्या तहसीलदाराना दिले होते. दरम्यान, २ आॅक्टोबर रोजीच्या बोईसर येथील ग्रामसभेत डंम्पिंग ग्राऊंड चा मार्ग मोकळा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे.