मालजीपाड्यातील घरात गावठी दारू जप्त; बायको, मुलाला अटक : नवरा फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:50 AM2017-09-08T02:50:55+5:302017-09-08T02:51:00+5:30
वालीव पोलिसांनी मालजीपाडा येथील एका घरावर छापा मारून दारुच्या मोठ्या साठ्यासह दारु बनवण्यासाठी लागणारे रसायन व सामग्री जप्त केली.
विरार : वालीव पोलिसांनी मालजीपाडा येथील एका घरावर छापा मारून दारुच्या मोठ्या साठ्यासह दारु बनवण्यासाठी लागणारे रसायन व सामग्री जप्त केली. याप्रकरणी नवरा, बायको आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बायको आणि मुलाला ताब्यात घेतले असून नवरा मात्र फरार झाला.
मालजीपाडा आणि ससूनवघर परिसरात गावठी दारू तयार केली जात असल्याचे वालीव पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर पुन्हा एकदा उजेडात आले आहे. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी आज सकाळी आपल्या पथकासह भरत जनार्दन राऊत (४२) यांच्या घरावर छापा मारला. यावेळी घरात पाचशे लिटर गावठी दारू सापडली. ११ ट्यूब आणि २५ ड्रममध्ये हा साठा दडवून ठेवण्यात आला होता. याची किंमत पंचवीस हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन आणि सामुग्री पोलिसांनी जप्त करून जागावरच नष्ट केली.
छापा पडल्यानंतर भरत राऊत पसार झाला. पोलिसांनी अवैध दारू विक्री व साठा केल्याप्रकरणी भरतसह त्याची पत्नी गीता राऊत (३८) आणि मुलगा हर्षद राऊत (१९) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गीता आणि हर्षदचा घरीच ताब्यात घेतले.
यापूर्वी मालजीपाडा, ससूनवघर परिसरातील अ़नेक दारुचे अड्डे उध्वस्त केले आहेत. ससूनवघर आणि मालजीपाडा परिसरात खाडीलगत आणि तिवरांच्या जंगलात गावठी दारू बनवण्याचे अनेक अड्डे आहेत. पोलीसांना या परिसरात कारवाई करताना दलदलीचा भाग असल्याने अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे गावठी दारू बनवणारे हाती लागत नाहीत. ही दारू वसई विरारसह हायवेमार्ग मुंबई आणि उपनगरात विकली जाते.