मित्रांसोबत मधूबन भागात फिरायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 10:32 PM2021-08-05T22:32:57+5:302021-08-05T22:33:46+5:30
मौजमजेसाठी वसई पूर्वेतील आठ ते दहा मित्र वसई पुर्वेतील मधुबन भागात गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गेले असता तिथे एक कन्स्ट्रक्शन साईटवर एक भला मोठा खड्डा पाण्याने भरलेला होता.
वसई : मित्रासोबत फिरायला गेलेल्या आठ ते दहा मित्रांपैकी एका सोळा वर्षीय मुलाचा कन्स्ट्रक्शन साईट वरील मोठ्याला खड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वसई पुर्वेतील मधुबन भागात गुरुवारी सांयकाळी 4.30 च्या सुमारास घडली असून करण तिवारी (वय 16) असे या मृत मुलाचे नाव आहे.
मौजमजेसाठी वसई पूर्वेतील आठ ते दहा मित्र वसई पुर्वेतील मधुबन भागात गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास गेले असता तिथे एक कन्स्ट्रक्शन साईटवर एक भला मोठा खड्डा पाण्याने भरलेला होता. दरम्यान फिरायला गेलेल्या मित्रांपैकी काही मित्र खड्याच्या काठावर बसून राहिले पण करण तिवारी (वय 16) व त्याचा अजून एका मित्र अशा दोघांनीही या पाण्यात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने करणचा पाय या खड्यातील मातीत रुतला. परिणामी खड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा अक्षरशः बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर त्या भागातील स्थानिकानी वसई विरार मनपा अग्निशमन व वालीव पोलिसांना देताच तात्काळ या दोघांनी घटनास्थळी धाव घेत काठी व गळाच्या सहाय्याने या मुलाचा मृतदेह अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.
कन्स्ट्रक्शन कंपनीचा हलगर्जीपणा नडला !
मधुबन भागातील या कन्स्ट्रक्शन साईटवर कुठलेही काम सुरु नव्हते त्यामुळे किमान बंद अवस्थेत असलेल्या साइटवर खड्डा कोणी खोदला व जरी खोदला असला तरी तो बंदिस्त करणे, फलक लावणे किंवा अन्य सुरक्षा म्हणून कुठल्याही प्रकारचे उपाययोजना काहीही नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. याप्रकरणी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत आता पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे वसई पूर्व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.