वाढवणच्या निषेधार्थ बहिष्कार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:23 AM2019-10-19T00:23:15+5:302019-10-19T00:23:23+5:30
सरकारी यंत्रणा हतबल : मतदानाचा टक्का घसरण्याची भीती
डहाणू : जिल्ह्यातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून डहाणूच्या बंदरपट्टी भागातील चिंचणी ते धाकटी डहाणूपर्यंतच्या किनारपट्टी भागातील वाढवण, वरोर, बाडापोखरण, वासगाव गुंगवाडा, तडीयाळे, धाकटी डहाणू, चिंचणी, ओसार या गावांनी वाढवण बंदर उभारणी आणि डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण, बरखास्त करण्याच्या सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पालघर विधासनसभा मतदारसंघातील किनारपट्टी भागातील आठ गावांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ठाम आहे. शिवाय उच्छेळी, दांडी, काम्बोडे, ते सातपाटीपर्यंतच्या मच्छीमार गावांनी देखील अस्तित्वाच्या या प्रश्नांसाठी मतदानावर स्वयंस्फूर्तीने बहिष्कार टाकण्याची तयारी चालवल्याचे समजते. किनारपट्टीवरील गावागावात सध्या बैठका होत आहेत. विशेष म्हणजे गावकरी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन सभा घेत आहेत. या बहिष्कारामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. मात्र ग्रामस्थ बहिष्काराच्या निर्णयावर ठाम असल्याने शासकीय यंत्रणा हतबल झाली आहे.
वाड्यातील दोन गावांचा बहिष्कार
वाडा : अवघ्या दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असतानाच वाडा तालुक्यातील चांबळे आणि डाकिवलीच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वाडा - भिवंडी महामार्गाला जोडणाºया डाकिवली - चांबळे - लोहपे रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. डाकिवली - चांबळे - लोहपे या रस्त्याची दुरावस्था बनली असून या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपासून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी तसेच अन्य वाहनांनी प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
रोजच प्रवास करणाºया विद्यार्थ्यांचेही हाल होतात. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी येत्या २१ तारखेला होणाºया मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.