भिन्न धर्म अन् वयातील अंतरामुळे घेतला ब्रेकअप; अभिनेता शिजान खानचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:46 AM2022-12-27T05:46:46+5:302022-12-27T05:47:33+5:30
तुनीषाने केलेल्या आत्महत्येमुळे पश्चात्ताप होत असल्याचे शिजान याने बोलून दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा: श्रद्धा वालकर खून प्रकरणानंतर झालेली चर्चा, भिन्न धर्म, तुनीषाला असलेल्या आजारावर उपचार करण्यासाठी आणि दोघांतील वयाच्या अंतरामुळे तुनीषा शर्मासोबत ब्रेकअप केल्याचे स्पष्टीकरण शिजान खानने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तुनीषाने केलेल्या आत्महत्येमुळे पश्चात्ताप होत असल्याचे शिजान याने बोलून दाखविल्याचेही सूत्रांनी सांगितले.
तुनीषाच्या आत्महत्येप्रकरणी वालीव पोलिसांनी अटक केलेला तिचा सहकलाकार आणि प्रियकर शिजान खान संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येनंतर देशातील वातावरणामुळे तो चिंतेत होता. तसेच तुनीषाला ‘पॅनिक अटॅक’ येत असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी, भिन्न धर्म आणि वयातील अंतरामुळे ब्रेकअप केल्याचे पोलिस कोठडीत शिजान खानने पोलिसांना सांगितले आहे.
तुनीषा शर्माने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहितीही शिजान खानने दिली आहे.
वालीव पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी व पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी बोरकर सोमवारी सकाळी शूटिंगच्या सेटवरील मेकअप रूममध्ये पंचनामा करण्यासाठी पोलिस पथकासोबत गेल्या होत्या. तपास अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आतापर्यंत सातजणांचे जबाब घेतल्याचेही कळते.
शिजानही नैराश्यामध्ये
तुनीषाने केलेल्या आत्महत्येमुळे शिजान खानही नैराश्यात आहे. आत्महत्येपूर्वी दुपारी दोघे सोबत जेवले होते. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याने डोळ्यांसमोर ती दिसत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"