भाताणे गावातील पुलाची झाली दुरवस्था, पर्यायी मार्ग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:40 AM2019-08-14T00:40:07+5:302019-08-14T00:40:28+5:30
विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
विरार : विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुलाला भेगा पडल्या असून प्रवाशांसाठी हा पूल धोकादायक बनत चालला आहे. मात्र, गावकऱ्यांना प्रवास करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतो आहे.
विरार महामार्गावरून काही अंतरावर असलेले भाताणे गाव हे अनेक वर्षांपासून धोक्याचा प्रवास करत आहेत. या गावात जाण्यासाठी मध्ये मोठी नदी पार करावी लागते. तर नदी पार करण्यासाठी बांधलेला पूल हा दिवसेंदिवस धोकादायक बनत असून पर्याय नसल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन येथूनच प्रवास करावा लागत आहे.
दर वर्षी पावसाळ्यात नदीत पाण्याची पातळी वाढल्यावर पूल पाण्याखाली जातो आणि गावकºयांचा संपर्क तुटतो. अनेक वर्षांपासून हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम कमकुवत होते आहे. पुलाला भेगा पडल्या असून पुलाच्या सळ्यादेखील बाहेर येत आहेत. तसेच पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले असून अनेकदा दुचाकीस्वार यामुळे पडले आहेत. या गावात पर्यटन स्थळे तसेच अनेक आश्रम असल्याने पुलावरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच या पुलावरून अवजड वाहने देखील जात असल्याने पुलाची अवस्था अधिकाधिक बिकट होत आहे.
पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने नदीमधील कचरा पुलाच्या कडेला अडकलेला आहे. यामुळे दुर्गंधी पसरते आहे. गावकºयांनी अनेकदा प्रशासनाला तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर येत नसल्याने गावकरी चिंतेत आहेत. पूल असलेल्या नदीत मगरी तसेच पूल कोसळण्याची भीती असल्याने सरस्वती नदी सारखी परिस्थिती उद्भवू नये अशी काळजी गावकºयांना वाटत आहे. पावसाळ्यात या पुलामुळे गावकºयांचे हाल होतात. यामुळे या पुलाची दुरु स्ती होणे गरजेचे आहे.
येत्या आठवड्याभरात पुलाची दुरुस्ती करण्यात येईल. लवकरच काम पूर्ण करू. गावकºयांना प्रवासासाठी हा एकच पूल असल्याने योग्यवेळ पाहून याची दुरुस्ती करण्यात येईल. तर पावसाळ्यानंतर नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होईल. - पी. आर. चव्हाण, कार्यकारी अभियंता, पी.डब्लू.डी.
‘‘प्रशासनाला अनेकदा पुलाची दुरु स्ती करण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीच मदत झालेली नाही.’’
- ज्योतोबा शेळके, सामान्य नागरिक
‘प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे. प्रशासन पाहणी देखील करून जात नाही. प्रवासासाठी दुसरा मार्ग नसल्याने या पुलाचा वापर करावा लागतो.’
- विलास परु ळेकर, सामान्य नागरिक