धुंदलवाडी आंबेसरीला जोडणारा पूल कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 05:43 AM2019-09-17T05:43:32+5:302019-09-17T05:43:34+5:30
धुंदलवाडी आणि आंबेसरीला जोडणारा बारीपाडा येथील पन्नास वर्षे जुना पूल सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान कोसळल्याने दळणवळण ठप्प झाले.
डहाणू/बोर्डी : आशागड मार्गे धुंदलवाडी आणि आंबेसरीला जोडणारा बारीपाडा येथील पन्नास वर्षे जुना पूल सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान कोसळल्याने दळणवळण ठप्प झाले. सुदैवाने जीवितहानी वा वाहनांचे नुकसान झाले नसल्याची माहिती डहाणू सार्वजनिक बांधकाम उप विभागाकडून देण्यात आली. हा पूल पन्नास वर्षे जुना होता.
रविवारी तालुक्याला पावसाने झोडपल्याने ढगफुटी होऊन २१६ मिमी पाऊस झाला. त्यामुळे ३.७० मीटर रुंदीचा आणि सहा मीटरचे दोन गाळे असलेला हा पूल दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कोसळल्याने दळणवळण ठप्प झाल्याची माहिती डहाणू सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे सहायक उपअभियंता श्रेणी १ चे धनंजय जाधव यांनी दिली. याबाबतची माहिती कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासात घटनास्थळ गाठले. मंगळवारी पुन्हा पुलाची पाहणी केली जाणार असून बाराशे मीटरच्या पाइपच्या साहाय्याने तत्काळ उपाययोजना करून दोन-तीन दिवसांत वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ ला जोडणाºया मार्गावरील दळणवळण आणि या मार्गाने गुजरातच्या संजाण, उंबरगाव या शहराकडील वाहतूक प्रभावित होणार आहे.
दरम्यान, या मार्गावर ५० किमी लांबीचा नवीन रस्ता बांधण्याचा अंदाजपत्रकात समावेश असून त्याअंतर्गत नवीन पुलाचे बांधकाम पावसाळ्यानंतर केले जाईल, असेही ते म्हणाले. रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. शिवाय ऊन असल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.