शाई नदीवरील पूल खचला, रस्त्यांची दुरवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 12:05 AM2019-07-14T00:05:30+5:302019-07-14T00:05:38+5:30
शहापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शाई नदीवरील पूल खचल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
शेणवा : शहापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शाई नदीवरील पूल खचल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. चार ते पाच दिवस होत असलेल्या मुसळधार पावसात तालुक्यातील बेलवली, हुंबाचापाडा, ढाढरे, तोरणपाडा, साखरपाडागाव तसेच इतर आदिवासी गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नदीला आलेल्या पाण्याच्या पुरात शाई नदीपात्रावरील पूल खचला आहे. पुलाची वेळीच दुरुस्ती न केल्यास पूल पूर्णत: खचण्याची शक्यता असून तसे झाल्यास गावपाडे, वाड्यांचा संपर्कतुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
७० वर्षे जुना असलेल्या या पुलाचे आॅडिट जिल्हा परिषदेकडून झालेच नाही. बºयाच वर्षांपासून पुलाचे नूतनीकरण करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला जिल्हा परिषदेकडून केराची टोपली दाखवली जात आहे. नागरिकांना उदरनिर्वाहासाठी तसेच आजूबाजूच्या गावातील मुलांना शिक्षणासाठी पूल ओलांडून जावे लागते. याशिवाय, रात्रीअपरात्री कुणी आजारी पडले तर मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे यांच्याशी संपर्कसाधला असता जिल्हा परिषदेला फक्त १५ मीटर काम करण्याची परवानगी असते. पण हा पूल जास्त लांबीचा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करायला लागेल, अशी माहिती देण्यात आली.