काळू नदीवरील पुलाचे काम संथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:42 PM2019-05-30T22:42:21+5:302019-05-30T22:42:40+5:30
ग्रामस्थ संतप्त : शहापूर, मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटणार
किन्हवली/ मुरबाड : शहापूर-मुरबाड रस्त्यावरील काळू नदीचा धोकादायक पूल दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यावरील नवीन पुलाचे बांधकाम नव्याने सुरू आहे. मात्र, संथगतीने सुरू असणाऱ्या या पुलाचे बांधकाम पावसाळ्याआधी होण्याची शक्यता नसल्याने शहापूर तसेच मुरबाड तालुक्यांचा संपर्क चार महिने तुटणार असल्याने येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.
नाशिकवरून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला जोडण्यासाठी शहापूर-मुरबाड-म्हसा-कर्जत-चौकफाटा असा नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. याआधी शहापूर तालुक्यातून मुरबाडला जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे यांच्या ताब्यात होता. या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाल्याने, या रस्त्याची मालकी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे गेली. सा.बां. विभाग आणि एमएसआरडीसीच्या वादात काळू नदीवरील हा पूल दोन वर्षांपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलावरून फक्त चारचाकी, दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती.
यावर्षी जानेवारी महिन्यात या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळेस काळू नदीवरील संपूर्ण पूल स्फोटकाच्या साहाय्याने उडवून लावत येथील वाहतूक थांबवली. पुलापासून दोन किमी अंतरावरील काळू नदीच्या पात्रामधून दगड टाकत वाहतुकीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, काळू नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणे शक्य नाही. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांना मुरबाड-शहापूर प्रवासासाठी सरळगावमार्गे लांबचा रस्ता अवलंबावा लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
काळू नदीवरील पुलाचे काम माझ्याकडे १५ दिवसांपूर्वीच आले असून आता दिवसरात्र काम सुरू आहे. या कामाची मुदत डिसेंबरपर्यंत असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून रहदारीसाठी पूल खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाळ्यात रस्त्यासाठी आणखी काही पर्याय देता येईल का, याबाबत आमचा विचार सुरू आहे - एस.के. गोसावी, उपअभियंता, एमएसआरडीसी