वरसावे पूल हलक्या वाहनांसाठी सुरूच
By admin | Published: September 15, 2016 02:07 AM2016-09-15T02:07:15+5:302016-09-15T02:07:15+5:30
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या गर्डरला तडा गेल्याप्रकरणी अद्याप विविध तपासणी अहवाल प्रलंबित आहे.
मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या गर्डरला तडा गेल्याप्रकरणी अद्याप विविध तपासणी अहवाल प्रलंबित आहे. यामुळे पुलाची कशा पद्धतीने व कधीपासून दुरुस्ती करायची, याचा निर्णयच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास घेता आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीही हलक्या वाहनांसाठी पूल खुला ठेवण्याचे सूचित केल्याने नागरिकांना तूर्तास दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पुलाचे मूळ नकाशे प्राधिकरणाला मिळाल्याने प्राधिकरणाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
वसई खाडीवर असलेल्या जुन्या पुलाच्या बांधकामास सुमारे ५० वर्षे झाली आहेत. १९६४ मध्ये भूमिपूजन होऊन काम सुरूझाले, तर १९७३ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. नवीन पूल बांधल्यानंतर वसई-विरार ते थेट गुजरात व मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने नव्या पुलावरून येतात. वसई-विरार, गुजरातकडे जाणारी वाहने जुन्या पुलावरून जातात.
दरम्यान, एका गर्डरला तडा गेल्याने डिसेंबर २०१३ ते जून २०१४ दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. त्यानंतर, या पुलावरून १५ टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना प्रवेश बंद करावा, असे प्राधिकरणाने सांगितले होते. पण, प्रत्यक्षात त्याचे पालन झाले नाही. पूल बंद असताना अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी, वाडामार्गे वळवण्यात आली. पण, नवीन पुलावरून दोन्ही बाजंूनी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवली होती. तरीदेखील कोंडी होऊन तास, दोन तास लागत असल्याने आता पुन्हा पूल बंद होणार, हे ऐकून नागरिकांसह वाहनचालक व पोलीस यंत्रणाही धास्तावली.
जुन्या पुलाच्या गर्डरला तडा गेल्याचे कळताच प्राधिकरणाने तातडीने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना पत्र देऊन पुलाचा वापर त्वरित बंद करण्यास कळवले होते. महाड पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच वरसावे पुलाची धास्ती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी जुना पूल १५ सप्टेंबरपासून बंद करण्याची व अवजड वाहने भिवंडीमार्गे वळवण्याची अधिसूचना काढली. शिवाय, हलक्या वाहनांना २० किलोमीटरपेक्षा कमी वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना जुन्या पुलावरून प्रवेश आधीच बंद केला आहे. ७५ पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन अवजड वाहने वळवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता तैनात केले आहेत. जुन्या पुलाच्या मूळ बांधकामाचे महत्त्वाचे नकाशे सापडत नसल्याने बांधकामाची माहिती व दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यास अडचण होत होती. आता ते नकाशे उपलब्ध झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले. पुलाच्या गर्डरला मोठा एकच तडा गेलेला आहे. त्याची पाहणी दिल्ली व गुजरातहून आलेल्या तज्ज्ञांंच्या पथकाने केली आहे. आणखी एक पथक १६ सप्टेंबरला येणार आहे. पुलासाठी वापरलेले काँक्रिट व आत वापरलेल्या लोखंडाची सध्याची क्षमता तपासण्याचा सल्लाही तज्ज्ञांंनी दिला आहे. परंतु, त्यासाठी लागणारी यंत्रणा फारच मर्यादित आहे. महाड दुर्घटनेनंतर देशभरातील जुन्या पुलांची तपासणी सुरू झाल्याने वरसावे पुलाच्या तपासणीसाठी आवश्यक यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)