दुरुस्तीसाठी बंद असलेल्या पुलाचा झाला स्केटिंग ट्रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:35 AM2018-11-15T05:35:02+5:302018-11-15T05:35:19+5:30
वाहतुकीस बंदी : तरीही आदेश मोडून वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
वसई : वसईतील दुरूस्तीसाठी बंद असलेला जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी मूहूर्त मिळाल्यानंतर रेल्वेकडून पुलावरील भार काढण्यास गेल्या महिन्याच्या १३ आॅक्टोबर पासून सुरवात करण्यात आली आहे. मात्र गेले तीन महिने बंद असलेल्या या पुलावरून वाहतूकीस बंदी असतानाही ती सुरु आहे. त्याबरोबरच आता या बंद पुलावर तरूण मूले स्केटींग करताना दिसत आहेत. माहिती देऊनही वाहतूक विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
१३ आॅक्टोबर पासून जुन्या अंबाडी रोड रेल्वे उड्डाणपूलावरील पालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या केबल्स, खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले होते. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. त्या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पुर्व आणि पश्चिमेला जोडणारा ३८ वर्ष जूना पूल बंद करण्यात आला होता. पुलाचे स्ट्रक्टरल आॅडीट न करता धोकादायक कसा काय असा सवाल पालिकेने करून तो खुला करण्याची मागणी केली होती. याबाबत एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यात महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे, महावितरण, खाजगी मोबाईल कंपन्या आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. पुलाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी त्यावरील भार हलका करण्याचा निर्णयÞ त्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार जुन्या पूलावरून गेलेल्या पालिकेच्या जलवाहिन्या, महावितरणाचे आणि खाजगी मोबाईल कंपन्यांचे केबल्स काढण्याचा निर्णयÞ घेण्यात आला. १३ तारखेपासून कामाला सुरवात झाली आहे. या पुलाच्या दुरूस्तीचा खर्च दोन कोटी रु पये असून पश्चिम रेल्वेने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा खर्च मागितला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा निधी येईपर्यंत रेल्वेकडून दुरूस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली होती.
पुलावर बेकायदेशीर वाहनतळ, गॅरेजवाल्यांच्या गाड्यांचे पार्किंग
दुरूस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या अंबाडी पूलाच्या दोन्ही मार्गावर बेकायदेशीर पणे सरार्स वाहने पार्किंग होऊ लागली आहेत. वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने कोणीही याठिकाणी वाहन उभे करून निघून जाते. जूना पूल बंद असल्याने वाहतूक नवीन पुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पूलावर वाहतूक कोंडी होत असते. तर दुसरीकडे जुना पूल दुरूस्त होत नाही आणि तरी देखील बंद ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पूलाला लागूनच पुर्वेकडे स्मशानभूमी असून त्याच्या बाजूला एक गॅरेजवाला आहे. या गॅरेजवाल्याने आपल्या कडे दुरु स्तीसाठी आलेल्या गाड्या सर्रास पणे या पुलावर जाणाऱ्या मार्गावर चढणीवर पार्क केलेल्या आहेत. तसेच पुलाच्या पश्चिम दिशेलाही पंचवटी हॉटेलजवळही पुलावर अनिधकृत रित्या वाहने पार्क केलेली पहायला मिळत आहेत.