२ हजार २३ कोटींचा पालिकेचा अर्थसंकल्प, आता मंजुरी ११ मार्चला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:54 AM2020-03-07T00:54:48+5:302020-03-07T00:54:51+5:30
निवडणूकधार्जिण्या अर्थसंकल्पा विषयीची चर्चा व अभ्यास काही विषयावर अपूर्ण राहिला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
वसई : दोन हजार २३ कोटींच्या अर्थसंकल्पाबाबतीत शुक्र वारी दुपारी संपन्न झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत काही ठोस उपाययोजना व मंजुरी होण्याची शक्यता होती, मात्र या निवडणूकधार्जिण्या अर्थसंकल्पा विषयीची चर्चा व अभ्यास काही विषयावर अपूर्ण राहिला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
स्थायी समितीत पालिका प्रशासनाने नवीन उड्डाणपूल, अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उद्यानांचे सुशोभिकरण, रुग्णालये आदी विकासासाठीच्या योजना व कामे यांचा सर्वांगीण समावेश असणाऱ्या २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा २ हजार २३ कोटी ९७ लाख रु पयांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले होते. त्या वेळी शुक्र वार दि. ६ मार्च रोजी याबाबतीत अभ्यासपूर्ण चर्चा व सविस्तर माहिती घेत साधारणपणे या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या विशेष बैठकीत चर्चा करून त्यास मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतरच हे कोट्यवधीचे अंदाजपत्रक मंजूर करून ते सभागृहासमोर अंतिम मंजुरीसाठी सादर केले जाईल, असेही प्रशासनाने म्हटले होते. परिणामी शुक्र वारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या अर्थसंकल्प व त्याच्या बाबतीत प्रदीर्घ चर्चा व माहिती घेण्यात आली असता बैठकीत बजेट बाबतीत एकमत न होता ही चर्चा अर्धवट सोडून त्यास ११ मार्चच्या सभेत ठेवले जाईल व पुढील निर्णय होऊन त्यास मंजुरी दिली जाईल, असे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी सांगितले.