बिल्डरांच्या फायली गायब झाल्या..., नगररचना विभागाची पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:43 AM2017-10-07T00:43:20+5:302017-10-07T00:43:36+5:30
वसईतील एका बिल्डरच्या चार फायली गायब झाल्याची माहिती मिळाल्यावरून घाबरलेल्या नगररचना विभागाने शोध मोहिम हाती घेतली.
वसई : वसईतील एका बिल्डरच्या चार फायली गायब झाल्याची माहिती मिळाल्यावरून घाबरलेल्या नगररचना विभागाने शोध मोहिम हाती घेतली. त्यासाठी नगरचना विभागातील कर्मचा-यांची झाडाझडती घेण्यात आली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, शोध मोहिमेत फायली कार्यालयातच पडलेल्या आढळून आल्या. त्यामुळे नगररचना खात्याचा आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी कारभार उजेडात आला.
दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. मुख्यालयातील नगररचना विभागाचे प्रभारी उपसंचालक संजय जगताप यांना बिल्डरच्या चार फायली गायब झाल्याची माहिती दिली. त्यासरशी त्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, फायली सापडत नसल्याने त्या खरोखरच गायब झाल्याचा संशय बळावला. त्यासरशी जगताप यांनी कार्यालयातील कर्मचाºयांची झाडाझडती घेतली. इतकेच नाही तर फायली सापडल्या नाहीत तर गुन्हे दाखल करीन असा इशाराही दिला. त्यामुळे संपूर्ण नगररचना कार्यालय गायब फाईल शोधायच्या कामाला लागले. मात्र, या प्रकारानंतर नगररचना विभागातील अनागोंदी कारभार उजेडात आला आहे. सध्या वसई विरार महापालिका हद्दीत बोगस कागदपत्रे तयार करणारे अ़नेक बिल्डरांवर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे फाईली गायब होऊ शकतात अशी भिती अनेकांनी वर्तवली आहे. पण, नगररचना विभाग अद्याप सावध झालेले नाही. नगररचनेचा अभिलेख कक्ष अद्याप अद्ययावत नाही. वसई विरार शहरातील बिल्डरांच्या शेकडो फाईल्स कार्यालयात पडलेल्या आहेत. आरटीआयमुळे फाईल्स झेरॉक्स आणि अधिकाºयांच्या माहितीसाठी वारंवार घेतल्या-ठेवल्या जात आहेत. अनेक फाईल्स विधी सल्लागार तसेच लिगल ओपीनियनसाठी आत-बाहेर कराव्या लागतात. असे करीत असताना त्या पुन्हा जागेवर ठेवल्या जात नाहीत.