बुलेट ट्रेनविरोधात ७० गावांमध्ये संघर्षयात्रा; पालघरमध्ये पार पडली सर्वपक्षीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:27 AM2018-06-04T01:27:49+5:302018-06-04T01:27:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या विरोधात ७० गावांमध्ये संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. ग्रामसभांचे ठराव घेऊन ते विधिमंडळ व संसदेत मांडणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी येथे झालेल्या बुलेट ट्रेन विरोधी जनमंच परिषदेत रविवारी सांगितले.
पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या विरोधात ७० गावांमध्ये संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. ग्रामसभांचे ठराव घेऊन ते विधिमंडळ व संसदेत मांडणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी येथे झालेल्या बुलेट ट्रेन विरोधी जनमंच परिषदेत रविवारी सांगितले.
कष्टकरी संघटना, भूमी अधिकार आंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा, गुजरात खेडूत समाज, पर्यावरण सुरक्षा समिती आणि शेतकरी संघर्ष समिती या सर्व संघटना बुलेट ट्रेन विरोधात एकवटल्या आहेत. त्यांनी रविवारी परिषद घेतली. त्यास शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते.
शिवसेनेचा बुलेट ट्रेनला विरोध आहे आणि राहील. १८ मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कृती समितीचे सदस्य रमाकांत पाटील, ब्रायन लोबो आणि उल्का महाजन यांची बैठक झाली होती. त्यात शिवसेनेचा पाठिंबा आंदोलनाच्या बाजूने असेल, असे ठाकरे यांनी सांगितले होते. बाधित ७० गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव संमत झाले. त्यांनी ते ठराव कृती समितीच्या माध्यमातून आमच्याकडे द्यावेत. विधिमंडळ व संसदेत त्यावर आवाज उठवू, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. गोºहे यांनी सांगितले.
महाराष्ट्र व गुजरातमध्ये बुलेट ट्रेन, बडोदा-एक्स्प्रेस महामार्ग आणि डीएफसी प्रकल्पाविरोधातील शेतकरी, आदिवासी व सामान्य जनतेच्या लढ्यात भाजपा व संघ परिवार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यापासून जनमंच व राजकीय पक्षांनी सावध असावे, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अशोक ढवळे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, मुंबईसह महाराष्ट्र व देशभर तेथील स्थानिक रेल्वे प्रवाशांचे प्रश्न अद्यापही सुटले नसताना बुलेट ट्रेनसारखी सेवा काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी आणली जात आहे. ही दिखाऊ बाब मोदींनी आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुलेट ट्रेनला विरोध केल्याचे मलिक यांनी सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, सामाजिक कार्यकर्ता उल्का महाजन, गुजरात खेडूत समाजाचे अरुण मेहता व कृष्णकांत, आमदार आनंद ठाकूर, अमित घोडा, रवींद्र फाटक, ब्रायन लोबो, रमाकांत पाटील, किरण गहला, श्रीनिवास वनगा, कुंदन संखे आदी उपस्थित होते.
बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा ‘परे’ची अवस्था सुधारा
शिवसेना बुलेट ट्रेन आणि महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आ. गोºहे यांनी सांगितले. बुलेट ट्रेनसाठी
महाराष्ट्राची ३९८ हेक्टर जमीन, पालघर जिल्ह्यातील २२१.३८ हेक्टर जमीन कशी वाया जाणार आहे, याची आकडेवारी आ. गोºहे यांनी सादर केली. पालघरमध्ये बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा पश्चिम रेल्वेची स्थिती बिकट असून आजही चाकरमान्यांना दरवाजात लोंबकळत प्रवास करावा लागत असल्याने पहिले त्यात सुधारणा करा, असे त्यांनी सांगून दिखाव्यासाठी विकास न करता विकासाला महत्त्व द्या, अशी सूचना नीलम गोºहे यांनी सरकारला केली.