बोर्डीमध्ये गणवेश घोटाळा, केंद्र शाळेतील प्रकार : शासनाकडून १.८४ कोटी व्यवस्थापनाकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:57 AM2018-02-27T01:57:19+5:302018-02-27T01:57:19+5:30
आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व विकासाच्या मुख्य धारेत त्यांना आणता यावे यासाठी शासनाकडून त्यांना गणवेश अनुदान निधी दिला जातो.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व विकासाच्या मुख्य धारेत त्यांना आणता यावे यासाठी शासनाकडून त्यांना गणवेश अनुदान निधी दिला जातो. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याची योजना कार्यान्वित असतांना बोर्डी येथील केंद्र शाळेमध्ये ती पालकांकडूनच वसूल केल्याचा प्रकार समोर येत आहे. हा प्रकार शासन निर्णया विरुद्ध असल्याने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशाचे चारशे रु पये थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या नुसार या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६ केंद्रातील ४६२ शाळांमधील पहिली ते नववीच्या ४५,९२५ विद्यार्थ्यांच्या गणवेश अनुदान प्रती विद्यार्थी ४०० रु पये या प्रमाणे १ कोटी ८४ लाख एवढा निधी शासनाकडून जमा झाला होता. पैकी १ कोटी ८३ लक्ष ७० हजार इतकी रक्कम या शाळांच्या व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केल्याची माहिती तालुक्याच्या सर्व शिक्षा अभियान या विभागाकडून देण्यात आली. मात्र, पालघर या आदिवासी जिल्ह्यात पालकांचे अज्ञान आणि बँकेत शुन्य बॅलन्सची खाती उघडण्यात येत असलेल्या अडचणी या मुळे अनेक विद्यार्थ्यांची खातीच उघडलेली नाहीत. ज्या पालकांनी पदरमोड करून पाल्यासाठी दोन गणवेश शिवून घेतले त्याची रक्कम चारशे पेक्षा अधिक झाली. तथापी चारशे रु पयांचे बील द्यायला शिंपी तयार नसून पालकही ते घ्यायला राजी नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचा अंतिम टप्यात हा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
पालकांवर आर्थिक व मानसिक दडपण-
शासनाच्या या नव्या धोरणामुळे पालकांना गणवेश निधिचा आर्थिक भुर्दंड सोसावा तर लागलाच. शिवाय ही योजना पूर्णत्वास नेताना शिक्षकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून ते मानिसक दडपणाखाली आहेत. परंतु ही कोंडी सोडवताना बोर्डी केंद्र शाळेत पालकांकडून प्रती विद्यार्थी चारशे रु पये रोख रक्कम घेतले आहेत. त्यानंतर एका स्थानिक ठेकेदारांकडून दोन गणवेश घेऊन त्याच्याकडून बील घेण्यात येणार आहे.
या शाळेत ज्या पालकांचे दोन ते तीन पाल्य शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शाळेने केलेल्या या व्यवहाराला अज्ञान व अशिक्षतिपणामुळे प्रतिउत्तर देण्याची ताकद पालकांकडे नसल्याने शाळेचे फावले आहे. मात्र या बद्दल चौकशी समिती नेमून संबंधीत केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा प्रकार जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या वार्डात झाला आहे.