घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; ६ गुन्ह्यांची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2024 03:32 PM2024-03-08T15:32:11+5:302024-03-08T15:32:26+5:30
गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी
मंगेश कराळे
नालासोपारा :- घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून सहा गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती शुक्रवारी जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी माहिती दिली आहे.
बिलालपाड्याच्या दुर्गा चाळीत राहणाऱ्या हरीओम पाल (२६) या रिक्षाचालकाच्या घरी ४ मार्चला रात्री चोरट्याने लोखंडी दरवाजाच्या कडीच्या बाजूची भिंत फोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातून १५ हजारांचा मोबाईल आणि ५ हजार रुपये रोख रक्कम चोरी करून नेली होती. पेल्हार पोलिसांनी ५ मार्चला घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपीचा शोध घेऊन पायबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार जाकीर सिराज शेखला ५ मार्चला ३० हजार रुपये किंमती मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून पेल्हारचे २, वसईचे ३ आणि माणिकपूरचा १ असे ६ गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, आश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, आतिश पवार, मनोहर तारडे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.