‘त्या’ दीडशे बॉक्समध्ये निघाले फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:54 AM2019-10-21T00:54:35+5:302019-10-21T00:54:50+5:30
मनवेलपाड्यात निवडणूक पथकाचा छापा
नालासोपारा : विरारमधील एका गोडाउनमध्ये संशयास्पदरीत्या बॉक्स ठेवण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. सदर ठिकाणी छापा मारल्यानंतर मात्र त्या दीडशे बॉक्समध्ये फटाके असल्याचे आढळून आले.
विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथील साई सावली इमारतीच्या तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये पहाटे पाच वाजता एका टेम्पोतून आणलेले बॉक्स संशयास्पदरित्या ठेवण्यात आल्याची तक्र ार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्याठिकाणी पोलीस आणि निवडणूक यंत्रणेचे पथक रविवारी दुपारी पोहोचले. या दोन्ही पथकांनी तपोवन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटची झडती घेतली. त्या फ्लॅटमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर साई सावली इमारतीच्या गोडाऊन ची तपासणी करण्याचा प्रयत्न या पथकाने केला. मात्र त्यास आक्षेप घेऊन काही तरु णांनी सर्च वॉरंट असल्यावरच झडती घ्या अशी भूमिका पोलिसांसमोर घेतली.
सदर गोडाऊनच्या केअरटेकरने चावी देण्यास मनाई केल्यानंतर अखेर पोलिसांनी गोडाऊन चा दरवाजा उघडण्यासाठी चावीवाल्याला बोलावले. त्यामुळे नमते घेऊन गोडाऊनची चावी पोलीस आणि निवडणूक पथकाला देण्यात आली.या गोडाऊनची झडती घेतली असता त्यात फटाके असल्याचे आढळले. सदर गोडाऊन आणि फटाके कमलेश सिंग यांचे असल्याचे पोलिसांनी निवडणूक पथकाला सांगितले. हे बॉक्स उघडून बघितल्यानंतर त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही असे निवडणूक अधिकारी प्रकाश जाधव यांनी सांगितले आहे.