गायब झालेला परिवहनचा बसस्टॉप पुन्हा लागला पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:32 PM2019-12-19T23:32:11+5:302019-12-19T23:32:14+5:30
मध्यरात्री बसस्टॉप अर्धा कापला : प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
मंगेश कराळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : ‘आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉप अचानक गायब?’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये
९ डिसेंबरच्या अंकात बातमी छापून झाल्यानंतर खडबडून जागा झालेला परिवहन विभाग आणि महानगरपालिका यांनी गायब झालेला परिवहनचा बसस्टॉप पुन्हा त्याच जागी लावला, पण तो अर्धाच लावला असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.
एका बिल्डरच्या भल्यासाठी हा स्टॉप काढण्यात आला होता, मात्र ‘लोकमत’ने याची दखल घेतल्यानंतर बसस्टॉप परत त्याच जागी लावण्यात आला. परंतु बुधवारी मध्यरात्री हा बसस्टॉप अर्धा कापून टाकण्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. तो काढण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाने प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा आहे. यामुळे वाहतुकीस खोळंबा, वाहतूक जाम किंवा एखादा अपघात घडू शकतो, अशी कारणे देऊन भरपूर प्रयत्न केले होते, पण ‘लोकमत’मध्ये याची बातमी लागल्यावर चारही बाजूंनी प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि ु्प्रशासनावर दबाव आला. अखेर यावर पांघरूण घालण्यासाठी महापालिकेने बसस्टॉप त्याच जागी लावला, पण तो अर्धाच ठेवला आहे.
वसई तालुक्यात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले बसस्टॉप अरुंद किंवा वाहतुकीस त्रास होत असताना उभे आहेत. मात्र बिल्डरच्या भल्यासाठी या स्टॉपवर महानगरपालिकेने कारवाई केल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवासी आंदोलन करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. हा बसस्टॉप धोकादायक आहे तर सर्वच बसस्टॉप महानगरपालिका आणि परिवहन विभागाने काढून टाकावेत, अशी मागणी सुद्धा प्रवाशांनी आणि स्थानिकांनी केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील मुख्य चौकाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी बसस्टॉपची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून आचोळे चौकातील या बसस्टॉपचा प्रवाशांकडून वापर केला जात होता. परंतु काही महिन्यांपासून नियोजित जागेत असलेला हा बसस्टॉप अचानक गायब झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. त्यांना बसची वाट पाहण्यासाठी उन्हातान्हात उभे राहावे लागत होते. हा बसस्टॉप हटविण्यामागचे कारण शोधताना एक धक्कादायक माहिती पुढे आली की, आचोळ्यात ज्या ठिकाणी जुना बसस्टॉप होता, त्याच्या मागच्या बाजूस एक इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत आता मोठे शोरुम उघडण्यात आले आहे. तसेच या जुन्या बस स्टॉपमुळे इमारतीची पुढची बाजू पूर्णपणे झाकली जात असल्याने या इमारतीचे कमी होत आहे. म्हणून बिल्डरच्या भल्यासाठी महानगरपालिकेने हा बसस्टॉप हटविण्याचा घाट घातला होता. पण याबाबत ‘लोकमत’ने बातमी छापून ही लोकोपयोगी बाब उघड केल्यावर बसस्टॉप पुन्हा लागल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला होता, पण मध्यरात्री अर्धा बसस्टॉप कापण्यात आल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.
महानगरपालिका बांधकाम व्यावसायिकांपुढे झुकली?
सर्कल असल्याचे कारण देऊन वाहतुकीस खोळंबा होईल म्हणून हा बसस्टॉप हटवण्यासाठी महानगरपालिकेवर राजकीय दबाव आणून किंवा काही आर्थिक साटेलोटे करून बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी महापालिका झुकली असल्याची जोरदार चर्चा आता जोर धरू लागली आहे. नालासोपारा पूर्वेकडील परिसरात अनेक अरुंद रस्त्यांवर बसस्टॉप आहेत, मग त्यांच्यामुळे वाहतुकीला त्रास किंवा ट्राफिक जाम होत नाही का? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.