आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉप अचानक गायब?; स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 02:02 AM2019-12-09T02:02:01+5:302019-12-09T02:02:33+5:30
महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती.
नालासोपारा : महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती. परंतु आता बिल्डरांच्या भल्यासाठी प्रशासनाकडून प्रवाशांवर कसा अन्याय केला जातो याचे जिवंत उदाहरण नालासोपारातील आचोळे चौकात बघायला मिळत आहे. बिल्डरच्या भल्यासाठी महापालिकेने चक्क आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉपच गायब केले आहेत. महानगरपालिकेचे हे कृत्य अत्यंत संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटत आहे. तर बसस्टॉपअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
३ आॅक्टोबर २०१२ रोजी वसई-विरार महानगरपालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरु केली होती. या वेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व मार्गिकांवर बसस्टॉप उभारण्यात आले होते. त्याच वेळी नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील मुख्य चौकाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी बसस्टॉपची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून आचोळे चौकातील या बसस्टॉपचा प्रवाशांकडून वापर केला जात होता. परंतु काही महिन्यांपासून नियोजित जागेत असलेला हा बसस्टॉप अचानक गायब झाला आहे. बसस्टॉप नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी उन्हातान्हात उभे राहावे लागते. विशेष म्हणजे वसई-विरार परिवहन सेवेसह ठाणे मनपाची परिवहन सेवाही याच बस थांब्यावर थांबते. हा बसस्टॉप हटविण्यामागचे कारण शोधण्यासाठी अधिक खोलात गेले असता एक धक्कादायक माहिती पुढे आली की, आचोळ्यात ज्या ठिकाणी जुना बसस्टॉप होता. त्याच्या मागच्या बाजूस एक इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत आता मोठे शोरुम उघडण्यात आले आहे.
तसेच या जुन्या बस स्टॉपमुळे इमारतीची पुढची बाजु पूर्णपणे झाकली जात असल्याने या इमारतीचे मूल्य देखील शून्य होत आहे. म्हणून बिल्डरच्या भल्यासाठी महानगरपालिकेने हा बसस्टॉप हटविण्याचा घाट घातला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिका प्रशासनाकडून आता आचोळे चौकात नवीन बसस्टॉप बांधण्यासाठी जागेची चाचपणी सुरू आहे. या प्रकाराविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
त्या बसस्टॉपमुळे मोठ्या गाड्या वळवताना त्रास व्हायचा तसेच अपघात होऊ नये म्हणून तो हटवला असला तरी त्याच ठिकाणी नवीन बस स्टॉप बनणार आहे. त्या ठिकाणी साचा बनवून आरसीसी बांधकाम केलेले आहे. ४ ते ५ दिवसांमध्ये साचा आल्यावर लगेच तिथे लावणार आहे.
- भुपेन पाटील, स्थानिक नगरसेवक.
सदर ठिकाणी बस स्टॉप बनवला जात होता, पण मोठ्या वाहनांना वळवताना त्रास होईल अशा तक्रारी आल्यामुळे बस स्टॉप आजूबाजूला बनवला जाणार आहे. - प्रितेश पाटील, सभापती,
परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका.