सेंच्युरी प्लाय कंपनीचा मालक असल्याचे भासवून, व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:33 IST2025-03-16T10:32:44+5:302025-03-16T10:33:19+5:30
तीन आरोपींना नालासोपाऱ्यातून अटक...

सेंच्युरी प्लाय कंपनीचा मालक असल्याचे भासवून, व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक
मंगेश कराळे -
नालासोपारा - सेंचुरी प्लाय कंपनीचा मालक असल्याचे सांगून कोलकाता येथील एका अंगडिया व्यापाऱ्याला १ मार्चला ५० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना अटक करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना नालासोपारा शहरातून अटक करत त्यांना कोलकाता पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सपोनी व जनसंपर्क अधिकारी शिवकुमार गायकवाड यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्चला एका आरोपीने कोलकत्ताच्या सिलीगुडी येथील डॉ. अग्रवाल यांना व्हाट्सऍपवर फोन केला. त्यांच्या परिचयातील सेंचुरी प्लाय कंपनीचे मालक भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांच्या वडिलांमार्फत ५० लाख रुपये घेतले. अग्रवाल यांची पैशाची फसवणूक झाल्याने ४ मार्चला कोलकत्ताच्या पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ६१(२), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी कोलकाता येथील पोलिस पथक १२ मार्चला पोलिस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांची भेट घेऊन माहिती दिली.
दरम्यान, पोलिस उपायुक्त (गुन्हे) आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे आरोपी सैयद काझी (३६), मोहम्मद जावेद चांदीवाला (२८) आणि सचिन आर्यभट (३२) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली आणि ते गुन्ह्यात सहभागी असल्याचे आढळून आले. अधिक तपासासाठी तिन्ही आरोपींना कोलकत्ताचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप दत्ता आणि त्यांच्या टीमकडे देण्यात आले.