बविआची शिट्टी गेली, रिक्षा मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:13 AM2019-04-14T00:13:16+5:302019-04-14T00:14:03+5:30
बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या निवडणूक चिन्हाबाबत वाद निर्माण झाल्याने आयोगाने ते गोठविले आहे.
पालघर/वसई : बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या निवडणूक चिन्हाबाबत वाद निर्माण झाल्याने आयोगाने ते गोठविले आहे. त्यामुळे ते आता कुणालाही दिले जाणार नाही. आयोगाने बविआला रिक्षा हे चिन्ह दिले आहे. बविआला चष्मा हे चिन्ह मिळावे अशी अपेक्षा होती. परंतु तसे झालेले नाही. शिट्टी हे चिन्ह मिळालेले नसले तरी त्याचा कोणताही विपरीत परिणाम बविआच्या या निवडणूकीतील कामगिरीवर होणार नाही, असे बविआचे सूत्रधार आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.
निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिट्टी या निवडणूक चिन्हावरून रात्री १२.३० वाजेपर्यंत रंगलेल्या नाट्यानंतर एकूण २१ पैकी ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १२ जणांमध्ये लढत राहणार आहेत. मात्र मुख्य लढत सेना भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित आणि बविआ, महाआघाडी चे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात रंगणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने शिट्टी हे चिन्ह गोठविले आहे. अपेक्षित असलेल्या चष्मा या चिन्हाऐवजी रिक्षा हे चिन्ह त्यांना मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात असल्याने शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चेतन पाटील, अमर कवळे, लुईस काकड, दत्ता सांबरे, प्रमोद मौळे, राजेश पाटील, रोहन वेडगा, विनोद भावर, सचिन शिंगडा या ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र बहुजन महापार्टीच्या एका उमेदवाराने आपल्या उमेदवारी अर्जात खाडाखोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अर्ज मागे घेणे आणि त्याअनुषंगाने मुक्त झालेल्या त्याच्या शिट्टी या चिन्हावर बविआने आपला हक्क सांगणे या वादावर झालेल्या युक्तिवादानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय देणे या सोपस्कारात रात्रीचे १२.३० वाजले. त्यामुळे उमेदवारांची अंतिम यादी त्यांना देण्यात आलेली चिन्हे वाटप करण्यास खूप उशीर झाला.
निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार आहेत.
>वसई : चिन्ह कोणते मिळेल याची मी चिंता करीत बसलो नव्हतो. त्यामुळे एका दिवसात रिक्षा ही निशाणी माझ्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचवली. रिक्षा-चालक व मालक संघटनांनीही भेट घेऊन रामनवमी उत्सवात प्रसाद व रिक्षा निशाणी घेऊन आमचा सन्मान केल्याची भावना व्यक्त केली,
- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी