अनधिकृत बांधकामविरोधातील मोहीम नालासोपाऱ्यात अधिक तीव्र
By admin | Published: November 7, 2015 10:20 PM2015-11-07T22:20:33+5:302015-11-07T22:20:33+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी नालासोपारा येथे दोन इमारती जमीनदोस्त
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी नालासोपारा येथे दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. या दोन्ही इमारती प्रत्येकी ३ व ४ मजल्यांच्या होत्या.
नालासोपारा पूर्वेस पेल्हार, संतोष भुवन या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. नालासोपारा सर्व्हे नं. १९० मध्ये बांधण्यात आलेली ४ मजली इमारत रस्त्याचे आरक्षण असलेल्या जागेत उभारण्यात आली होती. तर सर्व्हे नंबर १७२ येथे उभारण्यात आलेली ४ मजली इमारत हरित पट्ट्यात बांधण्यात आली होती. या सर्व इमारतींना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु त्यांच्यावर कारवाई करणे टाळण्यात आले होते. अखेर शुक्रवारी प्रशासनाने धडक मोहीम हाती घेऊन या इमारती जमीनदोस्त केल्या. ही मोहीम सलग सुरू राहणार असल्याचे मनपा सूत्राने प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले. लवकरच हद्दीतील समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या अनधिकृत रिसॉर्ट्सवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)