बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम गुंडाळली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:34 PM2018-07-21T23:34:35+5:302018-07-21T23:35:05+5:30

भंगार झालेल्या गाड्या अजूनही रस्त्यावर; घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक झाले त्रस्त

Campaign to seize unprovoked vehicles? | बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम गुंडाळली?

बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम गुंडाळली?

googlenewsNext

-राजू काळे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम ३० जून व २ जुलैला राबवून एकूण ३२८ पैकी केवळ २१५ बेवारस वाहने जप्त केली. दोन दिवस केलेल्या कारवाईनंतर मोहीम थंडावल्याने ती गुंडाळली का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अद्यापही ठिकठिकाणी भंगारावस्थेत वाहने उभी असून त्यावर कारवाई केव्हा होणार, अशी विचारणा होत आहे.
अशा वाहनांवर कारवाई करण्याचा ठराव २८ मार्चच्या महासभेत मंजूर झाला होता. या वाहनांचा शोध घेऊन त्यावर नोटीस बजावण्याचे निर्देश प्रभाग अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांना दिले होते. त्यानुसार, १४ ते १९ जूनपर्यंत एकूण ३२८ बेवारस वाहने शोधून त्यांच्यावर नोटिसा लावल्या.ही वाहने उचलण्यासाठी ३० जूनचा मुहूर्त निश्चित केला. जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी भार्इंदर पूर्वेकडील गोडदेव येथील आरक्षण क्रमांक २१९ वरील नागरी सुविधा भूखंडाची जागा ठरवली.
या कारवाईसाठी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी प्रभागानुसार सहा पथके तयार करण्याचे आदेश दिले. पथकाने ३० जून तर २ जुलैला केलेल्या कारवाईत ३२८ पैकी नोटीस शाबूत असलेल्या २१५ वाहनांवरच कारवाई करून ते टोइंग करण्यात आले. त्यासाठी तातडीने भाडेतत्त्वावर टोइंग व्हॅन मागवल्या.
या कारवाईनंतरही शहरातील काही भागांत भंगारावस्थेतील वाहने उभी असून त्यावर अद्याप जप्तीची कारवाई केलेली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात भंगारावस्थेतील वाहनांच्या आसपास घाणीचे साम्राज्य पसरत आहे. या पाण्यात डासांच्या अळ्या तयार होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

पालिकेने एकूण ३२८ वाहनांवर नोटिसा चिकटवल्या होेत्या. त्यातील ११३ वाहने त्यांच्या मालकांनी परस्पर हटवली. उर्वरित २१५ वाहने जप्त केल्यानंतर १५ वाहने त्यांच्या मालकांनी दंड भरून सोडवली. सध्या जप्त २०० वाहनांची नोंदणी रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला पत्रव्यवहार केला आहे. यानंतरही शहरात बेवारस वाहने असल्यास त्यावरील कारवाईचा अधिकार प्रभाग अधिकाऱ्यांना दिला आहे.
- संजय दोंदे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी

पालिकेने बेवारस वाहनांवर सुरू केलेली कारवाई केवळ दिखाऊपणाची ठरली आहे. आजही ठिकठिकाणच्या वाहतूक रस्त्यांजवळ बेवारस व भंगारावस्थेत वाहने उभी आहेत. पालिकेने किमान भंगार झालेल्या वाहनांवर त्यांचे मालकच अस्तित्वात नसल्यामुळे प्राधान्याने जप्तीची कारवाई करणे अपेक्षित आहे.
- शान पवार,
शहर सचिव, मनविसे

Web Title: Campaign to seize unprovoked vehicles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.