वर्षअखेर ठरतेय उमेदवारांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:24 PM2019-12-29T23:24:12+5:302019-12-29T23:24:15+5:30

कार्यकर्त्यांकडून पार्ट्यांची अपेक्षा; गावांसाठी कामे करण्याचीही होतेय मागणी

Candidates are suffering from headache at the end of the year | वर्षअखेर ठरतेय उमेदवारांची डोकेदुखी

वर्षअखेर ठरतेय उमेदवारांची डोकेदुखी

Next

पारोळ : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे ७ जानेवारीला मतदान होणार असल्याने व ३० डिसेंबर रोजी अगदी वर्षाअखेरीलाच अंतिम उमेदवार गटात व गणात जाहीर होणार असल्याने आपल्या पक्षातील कार्यकर्ते यांची मर्जी राखण्यासाठी व नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी वर्षाअखेरीच्या पार्ट्या जोरात होण्याची शक्यता असून या पार्टीसाठी लागणारी रसद कार्यकर्ते उमेदवारांकडून घेण्याच्या चर्चा रंगत असल्याने हे नववर्षाचे स्वागत उमेदवारांना डोकेदुखी ठरणार आहे.

वसई तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गण असून या वेळी कोणकोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे हे सोमवारी कोण माघार घेतेय, यावर ठरणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व पक्षीय उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर ताकद लावली आहे. उमेदवारी देताना त्या उमेदवाराची प्रतिष्ठा, पैसा व त्याच्या पाठीमागे उभे असलेले कार्यकर्ते या बाबींचा विचार झालेला आहे. जो उमेदवार उजवा त्यालाच उमेदवारी मिळालेली आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारात कार्यकर्ते महत्त्वाचे ठरत असल्याने उमेदवारांना त्यांची वर्षाअखेर सुखद करावीच लागत आहे. प्रत्येक गावात तरुणांचे ग्रुप असल्याने त्यांच्याकडून काही मागणी होणार आहे. जर मागणी पूर्ण केली नाही तर निवडणुकीत मतदार दुरावल्याचा धोकाही उमेदवारांना आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काही हजाराच्या घरात मतदार असल्याने व जर उमेदवारांची संख्या गणात किंवा गटात जास्त असेल तर शे-पाचशे वर विजयाचे गणित जुळत असल्याने उमेदवारांना मतदारांची मर्जी राखणे महत्त्वाचे ठरते. यंदा निवडणुकीची धामधूम वर्षाअखेरीला आल्याने उमेदवारांच्या खर्चात वाढ होणार आहे.

निवडणुकीचा खर्च लाखांच्या घरात
निवडणूक आली की आपल्या हाती काही येईल ही अपेक्षा काही मतदारांना असते, तर आम्ही तुम्हाला मदत करू आमच्या गावाला याची व्यवस्था करा, अशी सार्वजनिक मागणीही काही वेळा करण्यात येते. तर निवडून येणारे कोणी काहीही करत नसल्याने आले संधी तर हात धुवून घ्या, अशी भावनाही काही मतदारांमध्ये असते. त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा खर्चही लाखांच्या घरात गेला आहे.

Web Title: Candidates are suffering from headache at the end of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.