शिक्षिकेने विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:59 PM2019-12-24T23:59:34+5:302019-12-24T23:59:39+5:30
वसईच्या आश्रमातील घटना : गुन्हा दाखल
नालासोपारा : वसई पूर्वेकडील फादरवाडी विभागातील एका आश्रमाच्या शिक्षिकेने सहा वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थ्याच्या आईने वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही नालासोपारा पूर्वेकडील मदरशामधील मौलानाने १२ ते १४ विद्यार्थ्यांना चटके दिल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यामध्ये ५ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
वसई पूर्वेकडील फादरवाडीमध्ये जीवनपुष्प नावाचा आश्रम आहे. या ठिकाणी विघ्नेश गणेश पवार (६) आणि त्याचा भाऊ शिक्षण घेत आहे. या आश्रमाच्या शिक्षिका ईजाबेल घोन्सालवीस यांनी शनिवारी दुपारी विघ्नेशच्या दोन्ही हातांना मेणबत्तीचे चटके देत अमानुषपणे वागणूक दिली. याबाबत त्याची आई सुनीता हिने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
व्यवस्थापनाची दादागिरी मुलाला चटके दिले म्हणून आईने तक्र ार केल्यानंतर हा राग मनात धरून आश्रमाने त्या पीडित विद्यार्थ्याला आश्रमातून काढून टाकले आहे. गरीब आणि हतबल आईने मुलाला सध्या मुंबईच्या दादर परिसरात ती घरकाम करीत असलेल्या मालकाच्या घरी नेऊन ठेवले आहे. पण मुलांना ठेवण्यात मोठी अडचण असल्याचे तिने ‘लोकमत’ला सांगितले.
सदर आश्रमाच्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिले म्हणून तक्र ार आणि फिर्याद आल्यावर आरोपीविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
-विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे