मंडपात पत्त्यांचा डाव, पोलिस व्हॅनच्या आवाजाने पळताना तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 09:48 AM2023-09-24T09:48:35+5:302023-09-24T09:48:59+5:30
वसई-विरार शहरात गौरी - गणपती उत्सवात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार/नालासोपारा : विरार पश्चिमेकडील आगाशी कोल्हापूर येथील गणेश मंडपात शुक्रवारी रात्री उशिरा पत्ते खेळत असताना पोलिसांच्या वाहनाचा आवाज ऐकून घाबरून पळ काढणाऱ्या तरुणाचा पडल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रचित विनोद भोईर (वय १८) असे या तरुणाचे नाव असून, त्याला तत्काळ प्राथमिक उपचारांसाठी संजीवनी रुग्णालयात आणले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यानंतर संपूर्ण गावकऱ्यांनी संजीवनी रुग्णालयाला घेराव घालत आपला आक्रोश व्यक्त केला.
वसई-विरार शहरात गौरी गणपती मंडळांना रात्रीच्या वेळी गस्त घालून मंडपात बसलेल्या पदाधिकाऱ्यांना सतर्क राहावे अशा सूचना देत असतात. यातच विरार पश्चिमेकडील आगाशीजवळील कोल्हापूर गौरी मंडळात शुक्रवारी पोलिस भेट देण्यास गेले होते. त्या मंडपात काही मुले पत्त्याचा डाव खेळत होते. पोलिसांच्या वाहनाचा आवाज ऐकताच त्यांनी तेथून पळ काढला. आम्ही मंडपावर छापा घातला नाही. रात्रीच्या पोलीसांचे गस्तीचे वाहन तेथून जात होते. भीतीने मुले पळाली आणि त्यात या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले.
रात्री रुग्णालयात गर्दी
आगाशी गावातील लोकांनी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात गर्दी केली होती. याची माहिती मिळताच मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिस फौजफाट्यासह पोहोचून गर्दी नियंत्रित केली. प्रचित हा तरुण अभियंता होण्याचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांची गाडी बघून मुलांनी पळ काढला आणि पळत असताना प्रचित पडला.