निधी चौधरी प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:55 AM2017-08-04T01:55:50+5:302017-08-04T01:55:50+5:30
आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशनने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पालिकेतील कागदपत्रे आणि अहवाल मिळविण्याचे काम पोलीसांनी सुरु केले आहे.
अंबरनाथ : आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशनने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पालिकेतील कागदपत्रे आणि अहवाल मिळविण्याचे काम पोलीसांनी सुरु केले आहे. तर निधी चौधरी यांनी देखील आपली बाजू मांडण्यासाठी पालिकेतून कागदपत्रे मिळविण्याची धडपड सुरु केली आहे.
आयएएस अधिकारी निधी चौधरी ह्या अंबरनाथ पालिकेत प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी असतांना त्यांनी पालिकेच्या मालकीच्या धोकादायक इमारती पाडल्या होत्या. त्या प्रकरणात अपहार झाल्याचा आरोप करून तक्रारदार गुलाब करंजुले यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला जावा यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने तसा आदेश दिल्याने चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रमुख आरोप हा अपहार केल्याचा आणि खोटे दस्तावेज तयार केल्याचा गुन्हा आहे. सध्या चौधरी ह्या पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करित आहे. चौधरी यांनी न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी पालिकेतील कागदपत्रे गोळा केली आहेत. तसेच सर्व माहिती देखील त्यांनी मिळविली आहे. न्यायालयाने त्यांची बाजू जाणून न घेताच हा गुन्हा दाखल झाल्याने चौधरी यांनी न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी पुरावे मिळविण्याचे काम सुरु केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची जबाबदारी ही पोलीसांवर असल्याने पोलीसांनी देखील या प्रकरणाची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु केले आहे. ज्या इमारतींवर कारवाई करण्यात आली त्या इमारतींसंदर्भात पालिकेची भूमिका काय होती हे देखील जाणून घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस अधिकाºयांनी स्पष्ट केले. तर या प्रकरणात चौधरी यांना जामिन मिळू नये यासाठी तक्रारदार करंजुले हे देखील आपल्या परिने प्रयत्न करित आहेत.