कोरोना रुग्णांच्या उपचारांवर सीसीटीव्हींची नजर; वसई-विरार महापालिकेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:56 AM2020-07-02T04:56:04+5:302020-07-02T04:56:13+5:30
कोविड रुग्णालयांतील तक्रारींना बसणार चाप
पारोळ : वसई-विरार शहर महापालिकेने खाजगी रुग्णालयांतही राखीव खाटा ठेवून तेथे शासकीय दराने कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, बऱ्याचशा समर्पित कोविड-१९ रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांना जेवणखाणे वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यात संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयांत उपचारांत पारदर्शकता असावी, यासाठी वसई-विरार महापालिकेने प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आदेश जारी केला आहे.
१९ जून २०२० ला सुप्रीम कोर्टाने स्यूमोटो याचिका क्र. ०७/२०२० रोजीच्या आदेशान्वये कोविड-१९ बाधित रुग्णांच्या खबरदारीसंदर्भात निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे तत्काळ पूर्तीसाठी संबंधित समर्पित खाजगी, शासकीय रुग्णालयांना आदेश दिलेत.
वसई, विरारमध्ये असलेल्या कोविड-१९ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना औषधे, अन्न, गरम पाणी वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना संबंधित रुग्णालयांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे छायाचित्रण तपासणी, पर्यवेक्षणतज्ज्ञ समिती वा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्र यांनी निर्देशित केलेल्या अन्य प्राधिकारी संस्थेस उपलब्ध होईल, याची खात्री करण्याचे आदेश दिले.
मदत कक्षाचीही स्थापना करणार
सर्व कोविड-१९ रुग्णालयांनी रुग्णांसाठी एका इच्छुक सहायकास रुग्णालयाच्या आवारात उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी. जो रुग्णालयामार्फत निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये किंवा ठिकाणी उपस्थित राहील किंवा थांबू शकेल. तसेच सर्व कोविड-१९ समर्पित रुग्णालयांनी मदत कक्षाची स्थापना करावयाची आहे. जेथून प्रत्यक्षरीत्या तसेच फोनद्वारे रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात चौकशी करणे शक्य होईल, असे आदेश वसई-विरार शहर महापालिकेने दिले आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.