तलाठ्यांवर सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: August 6, 2015 11:27 PM2015-08-06T23:27:02+5:302015-08-06T23:27:02+5:30
तलाठी गैरहजर असतात, अशा तक्रारी आल्यानंतर या मनमर्जीला चाप लागावा म्हणून वसई महसूल विभागाने तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रीक मशीन
वसई : तलाठी गैरहजर असतात, अशा तक्रारी आल्यानंतर या मनमर्जीला चाप लागावा म्हणून वसई महसूल विभागाने तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रीक मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तलाठ्यांना १० ते १ च्या दरम्यान आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
कार्यालये उघडली जात नाहीत, ते वेळेवर कार्यालयांत येत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्रामीण भागातून आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. दादा दातकर व तहसीलदार सुनील कोळी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयांतील वस्तुस्थिती प्रांताधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना समजू शकणार आहे. तसेच सरकारी गोदामांमध्ये आलेले धान्य, दुकानदारांना केलेले वितरण व गोदामातील उर्वरित साठा या तिन्हींची माहिती शिधापत्रिकाधारकांना मिळावी, याकरिता एसएमएस, वेबसाइटवरील माहितीच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. दादा दातकर म्हणाले, या प्रक्रियेमध्ये आम्ही स्थानिक ग्रामस्थांनाही सहभागी करून घेत आहोत. एखाद्या दुकानदाराला किती धान्य मिळाले, याची माहिती एसएमएसद्वारे मिळाल्यानंतर ग्राहकांनी दुकानदारांकडे त्याची खात्री करावी व आलेले धान्य दुकानदार योग्य प्रमाणात वितरीत करतो का, यावर लक्ष ठेवावे, असा प्रयत्न आहे. यामुळे या यंत्रणेतील उणिवा काही प्रमाणात दूर होतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे.